मुंबईमधील भटक्या आणि घरोघरी पाळलेल्या कुत्र्यांना यापुढे लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. प्राण्यांच्या माध्यमातून होणारा लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला असून भटक्या कुत्र्यांना निर्बीजीकरणाबरोबरच ही लसही यापुढे देण्यात येणार आहे.

गेल्या १३ वर्षांमध्ये निर्बीजीकरण आणि लसीकरणाचे काम सुरू असतानाही आजघडीला मुंबईत १४,६७१ नर कुत्रे आणि ११,२६२ मादी कुत्रे आहेत. गेल्या वर्षभरात एका मादीने सरासरी चार पिल्लांना जन्म दिला असावा आणि त्यामुळे मुंबईतील कुत्र्यांची एकूण संख्या ६५ हजारांवर पोहोचली आहे, असा अंदाज पालिकेने प्रस्तावात व्यक्त केला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

निर्बीजीकरणाबरोबरच कुत्र्यांना लेप्टोस्पायरोसिसची प्रतिबंधात्मक लसही द्यावी. त्यामुळे कुत्र्यांच्या माध्यमातून लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव टळू शकेल, अशी उपसूचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी या वेळी मांडली. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम महत्त्वाची असल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी उपसूचनेसह या प्रस्तावास मंजुरी दिली. कुत्र्यांना लेप्टोस्पायरोसिसची प्रतिबंधात्मक लस देण्याची सूचना संबंधितांना करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.