लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मागील सहा महिन्यांपासून देशामध्ये क्षयरोग रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारकडून डिसेंबरपूर्वी औषधे मिळणे अशक्य असल्याने रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. मात्र या गंभीर बाबीची दखल आता देशातील क्षयरुग्ण, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली आहे. क्षयरुग्ण, डॉक्टर, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, शिक्षणतज्ञ, लेखक आणि आरोग्यविषयक वृत्तसंकलन करणारे पत्रकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना संपुष्टात आलेल्या औषधांच्या साठाबाबत तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात पत्रा पाठवून विनंती केली आहे.




२०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचे नरेंद्र मोदी यांनी लक्ष ठेवले आहे. मात्र क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने या कार्यक्रमाला मिळवलेले यश संपुष्टात येण्याची शक्यता आहे. औषधांचा अखंड पुरवठा ही क्षयरोग रोखण्याची पहिली पायरी आहे. मात्र औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना औषधे खरेदी करणे भाग पडत आहे. परंतु अनेक खासगी औषधांच्या दुकानांमध्येही औषधे मिळत नसल्याने रुग्ण हतबल झाले आहेत. औषधांचा पुरवठा थांबल्याने रुग्णांच्या उपचारामध्ये खंड पडत आहे. त्यामुळे एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. क्षयरोग रोखण्यासाठी औषधांचा पुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे, ही बाब देश-विदेशातील मान्यवर, सामाजिक संस्थांनी पत्राद्वारे नरेंद्र मोदी व मांडविय यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
आणखी वाचा-मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांच्या मौल्यवान वस्तू लंपास; १६ चोरट्यांना अटक
जगातील ११३ संस्था, ७०० पेक्षा अधिक नागरिकांच्या सह्यांचे पत्र
भारतात क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यासंदर्भात भारतासह अमेरिका, युगांडा, नायझेरिया, झांबिया, घाना, केनिया, पाकिस्तान, श्रीलंका, फिजी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, इंडोनेशिया आदी देशांतील सामाजिक संस्था व नागरिकांनी पत्रावर सह्या केल्या आहेत.
सूचविण्यात आलेल्या उपाययोजना
- डॉट्स आणि डॉट्स प्लस केंद्रांवर आपत्कालीन खरेदी आणि औषधांचे पुनर्वाटप करा.
- औषध खरेदी जलद करा, व्यवस्थापन सुधारा
- पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालींमध्ये पारदर्शकता आणा
- औषधांचा सातत्यपूर्ण पुरवठ्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर संसाधनांचे नियोजन करा
- भविष्यात औषधांचा तुटवडा टाळण्यासाठी औषध साठा स्तरांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रणाली तयार करा.