मुंबई : राज्यघटनेची मूल्ये पायदळी तुडवली गेली तर राज्यघटना केवळ पुस्तकांमध्ये शोभून दिसेल. सध्याच्या काळात राज्यघटना मृत्युपंथाला लागली आहे, अशी खंत ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. आज नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत सांगितलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही भारतीय संविधानाची त्रिसूत्री पायदळी तुडवली जात आहे, असेही केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना ते म्हणाले.

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील रंगस्वर सभागृह येथे २७ व्या डॉ. असगर अली इंजिनिअर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘दि कॉन्स्टिट्यूशन ॲज एनव्हिजन बाय इट्स फ्रेमर्स ॲण्ड इट्स कंटेम्पररी इंटरप्रिटेशन’ या विषयावर ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे बोलत होते. राज्यघटनेतील विविध पैलूंवर त्यांनी या वेळी विस्तृत भाष्य केले. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

आज सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केला जात आहे. ईडी कुणाच्याही घरी जाऊन कुणावरही कारवाई करताना दिसते आहे. मात्र, सत्ताधारी भाजप पक्षाशी संबंधित असणाऱ्या कुणावरही ईडीची कारवाई केली जात नाही. केवळ विरोधकांसाठी या यंत्रणेचा वापर केला जात आहे. यामुळे एक एक राज्य आणि त्यातील पक्ष हे भाजपमध्ये विलीन होत आहेत. त्यामुळे विरोधकांना कोणताही आवाज राहिलेला नाही अशी टीकाही दवे यांनी केली.

लोकशाहीची मूल्ये आज पायदळी तुडवली जात आहेत आणि त्यावर अगदी सर्वोच्च न्यायालयही आवाज उठवत नाही, याविषयी दवे यांनी खेद व्यक्त केला. लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी नागरिकांनीच आवाज उठवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यघटनेची निर्मिती ज्या उद्देशाने झाली त्या उद्देशाने आज कार्य होताना दिसत नाही, तसेच न्यायव्यवस्थेची निर्मिती ही नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या संरक्षणासाठी झाली आहे. मात्र, आज पाहिले तर न्यायव्यवस्थाही अपयशी ठरताना दिसते आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेसमोरील आव्हाने मोठी आहेत, असेही त्यांनी सांगितले. प्रश्न विचारणे हे न्यायालयाचे काम आहे. आज ते होताना दिसत नाही. मात्र, न्यायालय न्याय ठरवत नाही तर राजकारणी आणि पोलीस ठरवतात. हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

ध्येय म्हणजे मनगटात बळ असणे नाही तर देशासाठी योग्य भूमिका घेणे आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष अस्पी चिनॉय यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांनी भाजपच्या धर्मवादावरही टीका केली. मला राज्यकर्त्यांविषयी चिंता वाटत नाही. पण जे नागरिक आजची परिस्थिती स्वीकारत आहेत त्यांच्याविषयी चिंता वाटते आहे. आजच्या राजकीय परिस्थितीविषयी आपण आवाज उठवला नाही तर आजचे वादळ आपल्याला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असेही चिनॉय यांनी सांगितले.

शेषन यांच्यासारखे सापडणे कठीण

राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र आज परिस्थिती अशी आहे की अनेकदा बोगस मतदान होते आणि मतदाराला आपला मतदानाचा हक्क सिद्ध करावा लागतो हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. आज एकुणातच प्रशासकीय सुधारणा करू शकतील असे टी.एन. शेषनसारखे कुणीही नाही, आजच्या काळात शेषन यांच्यासारखे परखड भूमिका घेणारे कुणी सापडणे अवघड आहे आणि सापडले तरीही त्यांची नेमणूक कोण करेल हाही एक प्रश्नच आहे, असेही ते म्हणाले.