पोलीस उपमहासंचालक सुनील पारसकर यांनी मॉडेल बलात्कार प्रकरणी लाय डिटेक्टर तपासणीला नकार दिला असून संबंधित मॉडेलने मात्र कोणत्याही चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. लाय डिटेक्टर चाचणी करण्यापूर्वी ज्यांची तपासणी करायची आहे, अशा दोघांची संमती आवश्यक असते. त्यामुळे पोलिसांनी पारसकर आणि संबंधित मॉडेल या दोघांकडेही या संमतीची विचारणा केली होती. पारसकर यांनी लाय डिटेक्टर चाचणीला नकार दिला आहे. याबाबत आम्ही पोलिसांना लेखी कळवले आहे, असे पारसकर यांचे वकील रिझवान र्मचट यांनी स्पष्ट केले. हे दोघेही चौकशीदरम्यान काही प्रश्नांची उत्तरे देताना साशंक आहेत. त्यामुळे या चाचणीची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संबंधित मॉडेलने मात्र कोणत्याही चाचणीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. आपण सर्व चाचण्यांसाठी तयार असताना हा मोठा अधिकारी का तयार होत नाही, असेही या मॉडेलने विचारले आहे. पारसकर आपल्या विधानांमध्ये सतते फेरफार करत आहेत. लाय डिटेक्टर चाचणी केल्यास त्यांचे खोटे बोलणे बाहेर येईल आणि ते उघडे पडतील. त्यामुळेच ते या चाचणीला नकार देत आहे, असे या मॉडेलच्या वकील चित्रा साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना बॉम्ब निकामी करताना लागणाऱ्या जॅकेट्सच्या गुणवत्तेपेक्षा तकलादू जॅकेट्स पुरवण्याच्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या बिमल अग्रवाल या उद्योजकाशीही पारसकर यांचे संबंध असल्याचा आरोप या मॉडेलने केला आहे. अग्रवालने पारसकर यांना डिसेंबर २०१३मध्ये मालाडमधील एका मॉलबाहेर त्याच्या गाडीने सोडले होते. त्यानंतरच पारसकर आपल्याला मढ येथे बंगल्यावर घेऊन गेले होते, असे या मॉडेलचे म्हणणे आहे.