मुंबईत हलक्या सरी

वाऱ्याचा वेग कमी असल्याने सोमवारपासूनच हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

मुंबई : नोव्हेंबरचा पंधरवडा उलटल्यानंतरही मुंबईला थंडीची प्रतीक्षा असली तरीही अद्याप पावसाने मुंबईकरांची पाठ सोडलेली नाही. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून बुधवारी कोकण किनारपट्टीमध्ये वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे किनारपट्टी व अंतर्गत भागात दिवसभर वातावरण ढगाळ होते. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला.

कमी दाबाचे क्षेत्र ४८ तासांत किनारपट्टीपासून दूर जाऊन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत किनारपट्टीत पावसाळी वातावरण राहील. मंगळवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास मुंबई उपनगरात पावसाची पहिली सर आली. त्यानंतर दिवसभर ऊन कमी होते. दुपारनंतर दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरिवली, इत्यादी ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली. ठाण्यात गुरुवारीही पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे रविवापर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मुंबईत सध्या वाऱ्याचा वेग कमी असल्याने सोमवारपासूनच हवेची गुणवत्ता ढासळली आहे. मंगळवारी कुलाबा, माझगाव येथील हवा ‘अतिशय वाईट’ श्रेणीत होती. हीच स्थिती बुधवारीही बऱ्याच अंशी कायम होती. 

बेकेसी, मालाडमधील हवा वाईट

मंगळवारी ‘अतिशय वाईट’ श्रेणीत असलेली वांद्रे-कुर्ला संकुल आणि मालाड येथील हवा बुधवारी मात्र ‘वाईट’ श्रेणीत होती. येथील घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण किंचित कमी झाले होते. वांद्रे कुर्ला संकुल येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण २१८ आणि ‘पीएम १०’चे प्रमाण २३२ होते. मालाड येथे ‘पीएम २.५’चे प्रमाण २९३ आणि ‘पीएम १०’चे प्रमाण १२६ होते. हवेचा दर्जा गुरुवारीही फारसा सुधारण्याची आशा नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Light rain in mumbai zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या