मुंबई : वांद्रे येथील लीलावती रुग्णालयाच्या कार्यालयात आठ कलश पुरल्याच्या कथित प्रकारावरून दाखल करण्यात आलेल्या काळ्या जादूचा गुन्हा सत्र न्यायालयाने नुकताच रद्द केला. केवळ जमिनीखाली कलश आढळले म्हणून जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नाही. संबंधित कृतीतून जीविताला धोका निर्माण करणे किंवा गंभीर दुखापत घडविण्याचा हेतू असल्याचा सकृतदर्शनी पुरावा आवश्यक आहे, असे न्यायालयाने निकेत विजय मेहता यांच्याविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द करताना स्पष्ट केले.

लीलावती कीर्तीलाल मेहता वैद्यकीय ट्रस्टच्या विश्वस्तपदावरून निकेत मेहता आणि प्रशांत मेहता यांच्यात दीर्घकाळ वाद सुरू होता. त्यानंतर, १८ सप्टेंबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशांत मेहता आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ट्रस्टचे नियंत्रण आले. रुग्णालयाचा कारभार हाती घेतल्यावर प्रशांत यांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली आठ कलश आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यामध्ये मानवी अवशेष, तांदूळ, केस आणि अन्य विधीशी संबंधित वस्तू असल्याचा आरोप होता. या कथित प्रकारामुळे आपले आरोग्य खालावल्याचा तसेच विश्वस्तांना इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने काळी जादू केल्याचा आरोप प्रशांत यांनी केला होता. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रशांत यांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवून निकेत यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया सुरू केली होती.

न्यायदंडाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशाला निकेत यांनी वकील अलौकिक पै आणि सानिका गावडे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांचा हा आदेश रद्द केला. ट्रस्टच्या विश्वस्तपदावरून दोन्ही गटांत दीर्घकाळ न्यायालयीन संघर्ष सुरू होता. त्यामुळे ही तक्रार पूर्वीच्या वादाचे पुढील स्वरूप असल्याचे सकृतदर्शनी दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने निकेत यांना दिलासा देताना नोंदविले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींचे लेखी म्हणणे आणि संबंधित न्यायालयीन निवाड्यांचा विचार न करता ऐकीव माहितीच्या आधारे प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर निकषांशी विसंगत असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

साक्षीदारांच्या जबाबातून मानवी अवशेष सिद्ध नाहीत

कलश बाहेर काढण्याच्या कामात सहभागी असलेल्या कालुराम सैनी आणि विपुल चावडा या दोन साक्षीदारांनी तांब्याची भांडी, राख, तांदूळ आणि केस आढळल्याचे सांगितले. मात्र, त्यामध्ये मानवी हाडे असल्याचे त्यांनी सांगितलेले नाही. केस मानवी होते की अन्य तंतू आणि राख ही अघोरी विधीतील होती की धार्मिक होमहवनातील, हे स्पष्ट करणारा तज्ज्ञ अहवालही सादर झालेला नाही, असे सत्र न्यायालयाने निकेत यांच्याविरुद्धची कारवाई रद्द करताना म्हटले. कलश नेमके कधी पुरण्यात आले, कोणी पुरले आणि कोणाच्या सांगण्यावरून पुरले, याबाबत तक्रारीत स्पष्ट माहिती नाही. सात आरोपींची नावे असली तरी प्रत्येकाची स्वतंत्र भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. निकेत यांचा कथित कृत्यातील प्रत्यक्ष सहभाग दर्शविणारा पुरावाही नाही याकडेही न्यायालयाने त्यांना दिलासा देताना लक्ष वेधले.

धार्मिक विधीची शक्यता नाकारता येत नाही

वास्तुशास्त्र किंवा गृहप्रवेशाच्या वेळी कलश, धान्य आणि धार्मिक वस्तू जमिनीखाली ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे, कलश सापडणे एवढ्याच कारणावरून काळ्या जादूचा निष्कर्ष काढता येणार नाही. तसेच, प्रशांत यांच्या आरोग्याच्या समस्यांचा कथित विधींशी संबंध असल्याचेही सिद्ध झालेले नाही. इतरांना हानी न पोहोचविणाऱ्या धार्मिक आचरणाला संविधानाच्या अनुच्छेद २५ ते २८ अंतर्गत संरक्षण असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.