मुंबई : मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित असल्याचे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच, याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यात रायगड आणि मावळ हे दोनच लोकसभा मतदारसंघ असून दोन्हींसाठी अनक्रमे ७ व १३ मे रोजी मतदान होणार आहे. ही बाब लक्षात घेता कायद्याने दोन्ही मतदारसंघात केवळ मतदानाच्या ४८ तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत मद्यविक्रीला बदी घालता येऊ शकते. दोन्ही मतदारसंघात वेगवेगळ्या दिवशी मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अट लागू करू शकत नाहीत, असेही न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

हेही वाचा – अनुज थापन याची आत्महत्या नाही, मृत्यूची सीबीआय चौकशी करा, मागणीसाठी अनुजच्या आईची उच्च न्यायालयात याचिका

रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत आणि उरण या विधानसभा मतदारसंघाचा, तर रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. परंतु, लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमाला बगल देऊन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात मतदान काळात मद्यविक्रीवर बंदी घालणारा आदेश काढला आहे. औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाचा दाखला याचिकाकर्त्यांनी आदेशात सुधारणा करण्याची मागणी करताना दिला होता.

हेही वाचा – बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल, मुलुंड पोलिसांकडून सहा बेस्टची तपासणी

दुसरीकडे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १४२ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्रीवर बंदी घालण्याचे अधिकार असून त्यात हस्तक्षेप करता येऊ शकत नाही, असा दावा सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या याचिकेला विरोध करताना केला. तथापि, कायद्यानुसार बंदीचा आदेश हा केवळ मतदान क्षेत्रापुरता मर्यादित असून त्यापलीकडे तो लागू केला जाऊ शकत नाही. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्री बंदीचे आदेश लागू करण्याचा अधिकार असला तरी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या अधिकाराला मर्यादा आहेत, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना नमूद केले. शिवाय, मद्यविक्री बंदीचा आदेश हा केवळ मतदान काळापुरता मर्यादित असून त्यानंतर तो लागू होऊ शकत नाही, या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी लागू केलेल्या मद्यविक्रीच्या आदेशात सुधारणा केली. न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार, रायगड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ७ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत लागू असेल. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहील. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मद्यविक्री बंदीचा आदेश ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लागू होऊन १३ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत कायम राहील. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीरपर्यंत कायम राहील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor ban order limited to polling period and constituencies high court clarification mumbai print news ssb