मुंबई म्हणजे मायानगरी. या मुंबईतली लोकसंख्या ही घनदाट आहे यात शंकाच नाही. त्यामुळे इथे मुख्य समस्या आहे ती रस्त्यांवर कचरा फेकणाऱ्यांची. मुंबईतल्या विविध भागांमध्ये राहणारे लोक मुंबईतल्या रस्त्यावर कचरा टाकण्यात धन्यता मानतात. यावर आता उपाय म्हणून मुंबई महापालिकेने एक खास योजना आणली आहे. त्यासाठी एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेची मदत घेण्यात येते आहे.

मुंबई महापालिकेने पोस्ट करत योजनेबाबत काय माहिती दिली आहे?

मुंबईतील मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांवर (Garbage Vulnerable Points- GVP’s) कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाने तंत्रज्ञानाधारित अभिनव उपक्रम सुरू केला आहे. माहीम येथील डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटीका येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कॅमेरा लावण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल ओळखतो आणि तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे व उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन करतो.महानगरपालिकेकडून येत्या काही दिवसात मुंबईत विविध ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

जो व्हिडीओ पोस्ट केलाय त्यात काय दिसतं?

एक माणूस कचऱ्याची पिशवी घेऊन येतो. रस्त्याचा कडेचा भाग पाहून तिथे ती पिशवी फेकतो. ज्यानंतर AI कॅमेरा त्याला सांगतो या ठिकाणी कचरा टाकू नये. आपण या ठिकाणी कचरा टाकल्यास महानगरपालिका तुमच्यावर दंडात्मक कारवाई करेल. असं आवाहन AI कॅमेरातून ऐकू येतं. ज्यानंतर हा तरूण फेकलेली कचऱ्याची पिशवी उचलतो आणि तिथून पळ काढतो. कॅमेरात त्याच्या हालचालीही दिसत आहेत आणि त्याचा चेहराही दिसतो आहे. मुंबई महापालिकेने हा खास उपक्रम सध्या एकाच ठिकाणी सुरू केला असला तरीही आगामी काळात विविध ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबई महापालिकेने पोस्ट केल्यानंतर त्यावर लोकांनी काय म्हटलंय?

अभिजीत शिदोरे यांनी म्हटलं आहे तेली गल्ली अंधेरी पूर्व या ठिकाणी १५ वर्षांहून अधिक काळ लोक रस्त्यांवर कचरा टाकत आहेत, गेली अनेक वर्षे तक्रार केली आहे त्याची दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे. अपेक्षा वोरा यांनी म्हटलं आहे की हा महापालिकेचा चांगला उपक्रम आहे. कचरापेटी ठेवली असली तरीही त्यात कचरा लोक टाकत नाहीत. हा उपक्रम चांगला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. इशिता नावाच्या युजरने म्हटलं आहे कचरा फेकणाऱ्यांसाठी जो उपक्रम सुरू केला आहे तो चांगला आहे. महिला सुरक्षेसाठीही असं काहीतरी सुरू करा असं आवाहन त्यांनी केलं आहे. हा चांगला उपक्रम आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे.