राज्यात दोन वर्षात ३१५६ जणांचा मृत्यू

मुंबई : धोकादायकरीत्या दुचाकी चालविणे किं वा अन्य वाहनांच्या चुकीमुळे अपघात होऊन दुचाकीवरील सहप्रवाशालाही जीव गमवावा लागल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. यात हेल्मटे परिधान न के ल्याने २०१९ आणि २०२० या वर्षात रस्ते अपघातांत दुचाकीवरील ३१५६ सहप्रवाशांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दुचाकींची संख्या वाढतानाच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाचेही प्रमाण वाढत आहे. अतिवेगाने किंवा बेदरकारपणे दुचाकी चालवणे, दुचाकी चालवताना स्टंट करणे इत्यादींमुळे अन्य वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना त्याचा मनस्ताप होतो. यामुळे अपघातांचाही धोका संभवतो. या कारणांमुळे दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागत असून सहप्रवाशाच्या जिवालाही धोका निर्माण होतो. नियमानुसार दुचाकीवरील सहप्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. परंतु त्याकडे सहप्रवासी दुर्लक्ष करतात. शिवाय वाहतूक पोलीसही नियमाकडे कानाडोळा करतात. त्यामुळे सहप्रवाशांनाही रस्ते अपघातात प्राण गमवावा लागत आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये राज्यात दुचाकीवरील १६४६ सहकारी प्रवाशांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये १५१० सहकारी प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. यात मुंबई शहरात दोन वर्षात एकाही मृत्यूची नोंद नाही. तर ठाणे शहरात ३९, ठाणे ग्रामीणमध्ये ४५ आणि नवी मुंबई विभागात २४ सहकारी प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत चार हजार ५९१ जण गंभीर जखमी आणि एक हजार ८३४ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद यासह अन्य भागातही दुचाकींच्या अपघातात सहकारी प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत.