scorecardresearch

शिक्षण जगत : सेंट झेवियर्समध्ये मराठी दिन साजरा

मराठी भाषा दिनानिमित्त सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने ‘अभिजात मराठी’  या  कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन केले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने ‘अभिजात मराठी’  या  कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन केले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटय़, नृत्य, साहित्य, संगीत, इत्यादी कला सादर केल्या. कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी देशपांडे व रुत्वि चौधरी यांनी केले. यावेळी मराठी अभिमान गीताचे संगीतकार कौशल इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी साकारली होती. संगीत विभागाने काही मराठी गाण्यांचे सादरीकरण केले. तसेच कुसुमाग्रजांच्या दूर मनोऱ्यात या कवितेचे वाचन करण्यात आले.

मराठी साहित्याशी प्रथमच  आलेला संबंध व त्यातील कुसुमाग्रज यांची भूमिका अशी आठवण कौशल इनामदार यांनी श्रोत्यांना सांगितली. ‘‘वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!’’ असे इनामदार यांनी सांगितले. अखेरीस नाटय़ विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयी आदर व्यक्त करणारी ऑनलाइन नाटुकली सादर केली. कार्यक्रमाची सांगता मराठी अभिमान गीताने करण्यात आली.

‘रोजगाराच्या संधींमुळेच मराठीचे अस्तित्व संवर्धित होईल’

मुंबई : मराठी भाषा घेऊन पुढे काय करायचे, असा प्रश्न सर्वासमोर असतो. त्यामुळे मराठी भाषा आणि तिचे अस्तित्व हे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्यानेच संवर्धित होईल, असे ‘िथक महाराष्ट्र’चे प्रमुख संपादक दिनकर गांगल म्हणाले. के. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त त्यांच्याशी मुक्त संवाद साधला. 

‘मराठी माणसाच्या भावना ज्यातून व्यक्त होतात ती मराठी. म्हणून मराठी भावना आणि संस्कृती महत्त्वाची आहे. आपण जगतो तीच आपली संस्कृती असते. नव्या जगाच्या नव्या संवेदना आहेत. त्या जाणून घेण्यासाठी वाचन हे माध्यम आहे. त्यामुळे वाचन चळवळ वाढायला हवी. वाचनामुळे  मेंदू सतेज राहातो, जिज्ञासा जागी होते, असे गांगल यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात संकुलाच्या प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीत सादर केले. या वेळी मराठी विभागाच्या कार्याविषयीचे सादरीकरण अक्सा खान या विद्यार्थिनीने केले. यानंतर महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या समृद्ध कारकीर्दीचा आढावा घेताना महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य आणि मराठी विभागप्रमुख डॉ. वीणा सानेकर यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Living education celebrating marathi day at st xaviers students teachers ysh

ताज्या बातम्या