राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. यामुळं तिजोरीवर नक्कीच भार पडणार आहे. राज्यात वित्तीय तूट आहे. ती भरून काढावीच लागणार आहे. पण त्यातूनही मार्ग काढू, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. खरे तर आभाळ फाटल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. पण ती शिवल्याशिवाय राहणार नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आतापर्यंत देशातील कोणत्याच राज्यानं इतकी मोठी कर्जमाफी केली नाही. महाराष्ट्रातील भाजप सरकारनं ही सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे, असा दावाही त्यांनी पुन्हा केला.

कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्याचा केंद्रबिंदू पुणतांबा होता. आंदोलनानंतर सरकारनं शेतकरी कर्जमाफी केली. याबद्दल पुणतांब्यांच्या संपात सहभागी झालेल्या ४० गावच्या शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सह्याद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी खरे तर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांमुळे मिळाली आहे. त्यामुळं माझा सत्कार न करता खरे तर या पुणतांब्यातील शेतकऱ्यांचा सत्कार व्हायला हवा, असंही ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी द्यायची हे आधीच सरकारच्या मनात होतं. त्यामुळंच कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. पण कर्जमाफी द्यायचीच नाही, असं असतं तर ती न देण्यासाठी अनेक कारणं पुढं करता आली असती. पण राज्य सरकारला कर्जमाफी करायची होती, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गेल्या पंधरा वर्षांत शेती क्षेत्राची खूपच वाईट परिस्थिती झाली, असं सांगून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. राज्यात आमचं सरकार आलं. या तीन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा सामना करावा लागला. पण आम्ही डगमगलो नाही. त्याला मोठ्या धैर्यानं सामोरं गेलो, असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी तसं केलं नाही, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. यापुढेही समस्या कायम राहतील. पण त्यावर पर्याय शोधत राहू. प्रत्येक वेळी आंदोलन करण्याची गरज नाही. चर्चेचे नेहमीच मार्ग निघतो आणि आमचं सरकार चर्चेसाठी नेहमीच तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.