मुंबई : गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून बुधवारीही लोकल विलंबानेच धावत होत्या. मात्र लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईतील काही भागात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे बेस्ट बस अन्य मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना द्राविडीप्राणायाम घडत होता.

मुंबईत बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे मुंबईतील शीव परिसरातील रस्ता क्रमांक २४, गांधी मार्केट, महेश्वरी उद्यान, अॅन्टॉप हिल, संगम नगर, हिंदमाता, चेंबूरमधील शेल वसाहत, मानखुर्द रेल्वे स्थानक सब-वे येथे पाणी साचले होते. त्यामुळे या परिसरातील बेस्टच्या २४ मार्गांवरून धावणाऱ्या बसगाड्या शीव रस्ता क्रमांक ३, भाऊ दाजी रस्ता, सुलोचना शेट्टी मार्ग, भोईवाडा येथून वळविण्यात आल्या. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्ग, तसेच हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत आहेत. परिणामी, नागरिकांना सकाळी कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला. मात्र लोकल सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत होती.