लोकलचा ‘फर्स्ट क्लास’ स्वस्त?

वातानुकूलित लोकलचे भाडेदर कमी करण्याचे संकेत मिळत असताना सर्वसाधारण लोकलमधील प्रथम श्रेणी प्रवासही स्वस्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जानेवारीपर्यंत घोषणेची शक्यता

मुंबई : वातानुकूलित लोकलचे भाडेदर कमी करण्याचे संकेत मिळत असताना सर्वसाधारण लोकलमधील प्रथम श्रेणी प्रवासही स्वस्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील वर्षांच्या पूर्वार्धात मुंबईसह महानगर क्षेत्रांतील बहुतांश महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने त्यापूर्वी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी जानेवारीपर्यंत याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) सूत्रांनी दिली.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एमआरव्हीसी, मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत वातानुकूलित लोकलचे भाडेदर कमी करण्याबरोबरच लोकलच्या प्रथम श्रेणीच्या भाडेदराबाबतही चर्चा करण्यात आली होती. नुकतेच मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या बैठकीतही या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात प्रथम श्रेणीचे तिकीटदर कमी करण्याबाबत निर्णय जाहीर होऊ शकतो. पुढील वर्षी मार्च, एप्रिलदरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आदी महानगर पालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या तोंडावर प्रथमश्रेणीचा प्रवास स्वस्त करून मतदारवर्गाला खूश करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

सीएसएमटी ते दादर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे भाडे ५० रुपये आहे आणि याच मार्गावर वातानुकूलित लोकलचे भाडे ६० रुपये. चर्चगेट ते दादर प्रथम श्रेणीचे भाडे ७० रुपये आहे, तर या मार्गावरील लोकलच्या प्रथम श्रेणींचे भाडे कमी केल्यास त्यांचे प्रवासी वाढतील आणि रेल्वेला उत्पन्नही मिळेल, असा आशावाद अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

सध्या मुंबईतील वातानुकूलित लोकलचे तिकीट दर हे ६० रुपये ते २२० रुपयांपर्यंत (६० किलोमीटपर्यंत) आहेत. ते मेट्रोप्रमाणेच वातानुकूलित लोकलचे तिकीट दर १० ते ८० रुपयांपर्यंत (६०) ठेवण्याचा प्रस्ताव आहे. याच धर्तीवर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचेही तिकीट दर आणखी कमी करण्याचाही विचार सुरू आहे.

मेट्रोच्या धर्तीवर प्रवास भाडे?

 पश्चिम रेल्वेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात प्रवाशांनी एसी लोकलचे भाडे कमी करण्याची सूचना केली होती. हा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आल्यानंतर रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २३८ वातानुकूलित लोकल चालवण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच मेट्रोगाडय़ांच्या धर्तीवर वातानुकूलित लोकलची बांधणी करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.  या लोकलचे भाडेदर दिल्ली किंवा मुंबई मेट्रोप्रमाणेच असावे, असा विचार पुढे आला आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Local first class cheap ysh

ताज्या बातम्या