मुंबई : मुंबईमध्ये ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला असून या प्रकल्पासाठी वांद्रे रेक्लमेशन येथील जागेची निवड करण्यात आली होती. मात्र वांद्रे रेक्लमेशन येथे ‘मुंबई आय’ प्रकल्प उभारण्यास स्थानिक रहिवासी आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी कडाडून विरोध केला आहे. परिणामी, ‘मुंबई आय’ प्रकल्प इतरत्र हलविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. दरम्यान, मुंबई बंदर प्राधिकरण, वांद्रे – कुर्ला संकुल किंवा बॅलार्ड इस्टेट अशा पर्यायी जागा या प्रकल्पासाठी सुचविण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अंधेरीमधील पुठ्ठ्यांच्या गोदामाला आग

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमएमआरडीएने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुंबई आय’ प्रकल्पाअंतर्गत समुद्र किनाऱ्यावर १२० ते १५० मीटर व्यासाचा उंच पाळणा उभारण्यात येणार आहे. काचेचे आच्छादन असलेल्या या उंच पाळण्यातून समुद्रासह मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या प्रकल्पात पाळणा उभारण्यासह परिसराचा विकास करून तेथे आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या प्रकल्पास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर एमएमआरडीएने प्रकल्पाच्या तांत्रिक व्यवहार्यतेसह इतर कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा मागविल्या आहेत. दरम्यान, एमएमआरडीएने ‘मुंबई आय’साठी वांद्रे रेक्लमेशन येथील एका जागेला पसंती देऊन तेथे प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र तेथे ‘मुंबई आय’ उभारण्यास आशिष शेलार आणि स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे.

हेही वाचा >>> मुंबई: जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल

वांद्रे रेक्लमेशन हा गर्दीचा परिसर आहे. येथे हा प्रकल्प उभारल्यास येथील गर्दी आणि वाहतूक कोंडी वाढेल असा आक्षेप घेत या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. हा प्रकल्प इतरत्र हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधींचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार निविदेत बदल करून वांद्रे रेक्लमेशनऐवजी इतर ठिकाणची जागा सुचवावी असे नमूद केल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता मुंबई आय वांद्रे रेक्लेमेशनऐवजी अन्यत्र उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या भूखंडावर किंवा वांद्रे – कुर्ला संकुल अथवा बॅलार्ड इस्टेट येथे ‘मुंबई आय’ उभारण्यात येण्याची शक्यता आहे. ‘मुंबई आय’ नेमके कुठे उभारणार हे सल्लागाराच्या अभ्यासानंतरच स्पष्ट होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local resident bjp mla ashish shelar oppose mumbai eye project in bandra reclamation mumbai print news zws
First published on: 01-06-2023 at 15:54 IST