प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई  : दादरमध्ये खरेदीच्या निमित्ताने येणाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी पालिका आणि दादर व्यापारी संघाने संयुक्तरीत्या केलेल्या व्हॅले पार्किंगच्या धर्तीवर मुंबईच्या अन्य भागांतही अशी व्यवस्था करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ऑनलाइन खरेदीचा बसलेला फटका, वाहन उभे करण्यास मिळत नसलेली जागा यामुळे ग्राहक बाजारपेठांकडे पाठ फिरवू लागले आहेत. काही ग्राहक अस्ताव्यस्तपणे रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. एकूण परिस्थितीमुळे ठिकठिकाणच्या बाजारपेठांमधील व्यापारी, स्थानिक रहिवासी, पादचारी हैराण झाले आहेत.

ग्राहकांना किमान वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध झाली, तर ते बाजारपेठांमध्ये येतील आणि व्यवसायात बरकत येईल, असे किरकोळ व्यापाऱ्यांचे, तर वाहने व्हॅले पार्किंगमध्ये उभी राहिली तर रस्ते मोकळे होऊन मोठय़ा त्रासातून सुटका होईल, असे नागरिक, पादचारी आणि वाहनचालकांचे म्हणणे आहे. काही बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी सरकारी यंत्रणांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.  दादरमध्ये मोठय़ा संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असतात. भल्या पहाटे दादर स्थानकालगतच पश्चिमेला भाजी आणि फुलांचा मोठा बाजार भरतो. त्यावेळी या परिसरात पाय ठेवायलाही जागा नसते. त्यानंतर हळूहळू दुकाने उघडल्यानंतर कपडे आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी मोठय़ा संख्येने नागरिक येत असतात. उत्सव काळात तर दादरची बाजारपेठ गर्दीने फुलून जाते. बहुसंख्य नागरिक शहरातून किंवा उपनगरांमधून आपापल्या वाहनाने दादरमध्ये येत असतात.  अनेक नागरिक रस्त्यालगत जागा मिळेल तशी अस्ताव्यस्तपणे आपली वाहने उभी करून निघून जातात. त्यामुळे पादचारी, स्थानिक रहिवासी, दुकानदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. यावर तोडगा काढण्यासाठी दादर व्यापारी संघाने पुढाकार घेत पालिकेच्या मदतीने व्हॅले पार्किंगची योजना आखली आणि गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर व्हॅले पार्किंग सुविधेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे वाहतुकीला होणारा त्रास कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. आता दादरमधील कोतवाल उद्यान, आयसीआयसीआय बँक, जिप्सी कॉर्नरच्या समोर, एस. के. बोले रोड आणि रानडे रोडवरील सर्वोदय सोसायटी येथे व्हॅले पार्किंगची सुविधा आहे. स. ११ ते रा. १० या वेळेत पहिल्या चार तासांसाठी १०० रुपये आणि त्या पुढील प्रत्येक तासासाठी २५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये ९३ वाहने या व्हॅले पार्किंगमध्ये उभी करण्यात आली होती.

दक्षिण मुंबईमधील महात्मा जोतिबा फुले मंडई आणि आसपासच्या परिसरात (क्रॉफर्ड मार्केट) खरेदीसाठी दररोज मोठय़ा संख्येने ग्राहक येत असतात. या परिसरात वाहने उभी करण्यासाठी अधिकृत वाहनतळच नाही. अनेक ग्राहक वाहन उभे करण्यासाठी जागा मिळत नसल्याने ते हैराण होतात. याच कारणामुळे काही मंडळी येथे खरेदीसाठी येथे येण्यास टाळाटाळ करतात.  अंधेरी परिसरातही रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दादरमध्ये मोठय़ा संख्येने नागरिक आपल्या वाहनाने खरेदीसाठी येतात. येथील कोहिनूर स्क्वेअरमधील सार्वजनिक वाहनतळ एका बाजूला असल्यामुळे वाहनचालकांना असुविधा होते. नागरिकांच्या मागणीनुसार व्हॅले पार्किंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद वाढू लागला आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल.

किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी-उत्तर विभाग

पोलीस आयुक्तालयात अधिकारी वर्गाची वर्दळ, महात्मा जोतिबा फुले मंडई आणि लगतच्या परिसरात खरेदीसाठी मोठय़ा संख्येने ग्राहक येतात, परंतु या भागात वाहने उभी करण्यासाठी अधिकृत वाहनतळच नाही. रस्त्यालगत वाहन उभे केल्यानंतर वाहनमालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे दादरच्या धर्तीवर महात्मा जोतिबा फुले मंडईच्या आसपास वॅल पार्किगची व्यवस्था केल्यास अनेक प्रश्न सुटतील आणि ग्राहक, व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. व्हॅले पार्किंगसाठी पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरात लवकर या मागणीचा विचार करावा. 

वीरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन

व्हॅले पार्किंग सुविधा ही केवळ अन्य परिसरांतून दादरमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी नाही. तर स्थानिक रहिवाशांनीही या सुविधेचा विचार करायला हवा. स्थानिक रहिवाशांनी आपली वाहने वॅलेट पार्किंगमध्ये उभी केली तर ती सुरक्षित राहतील आणि रस्तेही मोकळे होतील. परिणामी, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

सुनील शाह, अध्यक्ष, दादर व्यापारी संघ