मुंबई : पवई तलावाच्या रक्षणासाठी स्थानिक पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवासी यांच्यावतीने येत्या रविवारी मूक साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेव्ह पवई लेक’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या शांततामय आंदोलनात तलावाच्या परिसरातील कचरा , जलपर्णीचा वेढा आणि जैवविविधतेला निर्माण होणारा धोका याविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे.
स्थानिक रहिवाशांनी केलेली मागणी आणि पर्यावरणप्रेमींनी थेट मुख्यमंत्र्यांना घातलेले साकडे आदी बाबी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने पवई तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे. मात्र, अनेक तक्रारी करुनही याआधी पवई तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले गेले. कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत अशी खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
आता पालिकेकडून जरी स्वच्छता करण्यात येत असली तरी तात्पुरती स्वरूपाची असणार. पुन्हा काही दिवसांनी तलावाची तीच स्थिती होणार. दरम्यान, यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजता तलावाच्या येथील सेल्फी पॉइंटवर मानवी साखळी तयार केली जाईल. दरम्यान, पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे. त्या अंतर्गत पालिकेने तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याचे काम २३ मेपासून हाती घेतले.
दरम्यान, २३ मे ते १ जून या दहा दिवसांच्या कालावधीत १ हजार ४५० मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात पालिकेला यश आले आहे. तसेच, जलपर्णी काढताना नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची खबरदारीदेखील घेतली आहे.पालिकेने उपाययोजना सुरु केली असली तरी ती उशिरा सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांना तलावाबाबत सत्य परिस्थिती माहीत असावी यासाठी ही मानवी साखळी असणार आहे असे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.
पवई तलाव विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे. तेथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्यात ओरिएंटल डार्टर आणि ब्लॅक-हेडेड आयबिस अशा काही दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश आहे.तलावाच्या पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावात जलपर्णी आणि इतर वनस्पतींची वाढ झाली आहे. ज्यामुळे युट्रोफिकेशनची समस्या निर्माण झाली आहे. २००२ साली, राष्ट्रीय तलाव संरक्षण योजनेअंतर्गत पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पात जलपर्णी काढणे, जलशुद्धीकरण, आणि परिसराचे सौंदर्यीकरण यांचा समावेश होता. आयआयटी मुंबईच्या १९८० च्या बॅचनेही तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी योगदान दिले आहे.
मगरींचा अधिवास पवई तलावात मगरींचा अधिवास आहे. अनेकदा मगरी तलावाच्या काही भागांत सहजपणे दिसतात. तसेच आयआयटी मुंबई परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेकदा मगरी विहार करताना दिसल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा मगरी तलावाबाहेर येतानाही दिसतात. महानगरपालिकेने २०२२ मध्ये प्रथमच पवई तलावातील मगरींची गणना केली त्यात १८ मगरी आढळल्या होत्या. त्या प्रामुख्याने आयआयटी मुंबई आणि रेनिसंस हॉटेलच्या परिसरात दिसतात.