सीएसटी, दादर, ठाणे स्थानकांजवळ लोकलना सक्तीचा थांबा
आपल्या रखडपट्टीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय जलद मार्गावर सध्या दर रात्री दिरंगाईचा खेळ चालू आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेली लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या आणि त्यांच्या वेळा उपनगरीय जलद मार्गावरील गाडय़ांच्या वेळेच्या खूपच जवळपास आहेत. त्यामुळे लोकल गाडय़ा किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ा या दोहोंपैकी एक गाडी अगदी एक-दोन मिनिटे उशिराने सुटली, तरीही त्याचा फटका उपनगरीय गाडय़ांना बसतो. सीएसटीहून निघाल्यावर यार्डात किंवा दादर व ठाणे स्थानकाआधी या लोकल गाडय़ा चांगल्याच रखडत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास होतो.
रेल्वेच्या व्याख्येनुसार गर्दीची वेळ साडेसातपर्यंत संपते. त्यानंतर रेल्वेचा ‘नॉन पीक अवर’ सुरू होतो आणि त्यात लांब पल्ल्याच्या गाडय़ांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे उपनगरीय गाडय़ांना लाल सिग्नल देऊन थांबवले जाते. रात्री नऊ ते दहा या एका तासात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि दादर या स्थानकांतून एकूण आठ गाडय़ा निघतात. यापैकी सहा गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून निघतात. तर या दरम्यान मुंबईहून चार जलद गाडय़ा निघतात.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांपैकी किंवा उपनगरीय गाडय़ांपैकी एकाही गाडीला निघण्यासाठी दोन मिनिटांचा विलंब झाला, तरी उपनगरीय गाडीला सिग्नल देऊन थांबवले जाते. त्यामुळे रात्री खोपोली किंवा कल्याण या दोन जलद लोकल रेल्वेगाडय़ा हमखास पाच ते दहा मिनिटे उशिरानेच धावतात. तसेच या गाडय़ा दादर किंवा ठाणे या स्थानकांआधीही थांबवल्या जातात. ९.२६ वाजता सुटणाऱ्या कर्जत लोकललाही याच समस्येला सामोरे जावे लागते.
ही समस्या दूर करण्यासाठी वेळापत्रकात फेरफार करावे लागतील. मात्र सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची व उपनगरीय गाडय़ांची संख्या प्रचंड वाढली असल्याने उपलब्ध वेळेत सर्वच गाडय़ा बसवणे खूपच जिकिरीचे काम आहे, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच यावर पाचवी-सहावी मार्गिका हा एकमेव तोडगा असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

मुंबईहून रात्री ९.२६ वाजता कर्जतसाठी निघणाऱ्या जलद गाडीच्या आधी ९.२० वाजता सोलापूर एक्सप्रेस आणि नंतर ९.३० वाजता मुंबई-हावडा (अलाहाबादमार्गे) या दोन गाडय़ा निघतात. रात्री ९.३० वाजता दादरहून तिरुनेलवेल्ली-पुद्दुचेरी येथे जाण्यासाठी एक गाडी निघते. तर ९.४५ वाजता दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस गाडी निघते. ९.५० वाजता मुंबई सीएसटीहून हुसेनसागर एक्सप्रेस आणि १०.०० वाजता मँगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस रवाना होते. या गाडय़ांच्या जंजाळामुळे रात्री ९.५४ वाजता सीएसटीहून निघणारी १५ डब्यांची कल्याण जलद, आणि १०.०४ वाजता निघणारी खोपोली जलद या गाडय़ा हमखास दिरंगाईने सुटतात.