भाजपचा एका जागी विजय निश्चित, मात्र उमेदवाराबाबत उत्कंठा; काँग्रेसची पाटी कोरी

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक :- मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडण्यात येणाऱ्या सदस्यांपैकी मुंबईतील दोन जागांवर १० डिसेंबरला मतदान होत आहे. पालिकेतील नगरसेवकांचे सध्याचे बळ पाहता शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी एका सदस्याचा विजय निश्चित आहे. मात्र, शिवसेनेतून रामदास कदम यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे, तर संख्याबळ नसल्याने काँग्रेसचे भाई जगताप यांनाही जागा गमवावी लागणार आहे. अशात भाजप कोणाला उमेदवारी देते, याबाबतही उत्कंठा निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मतदानातून दोन सदस्यांची विधान परिषदेवर निवड होते. शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप यांची मुदत १ जानेवारी रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने १० डिसेंबरला मतदान तर १४ तारखेला मतमोजणीचा कार्यक्रम जाहीर केला. विधान परिषदेसाठी पाच स्वीकृत सदस्यांसह एकूण २३२ सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. दोन जागांसाठी निवडणूक असल्याने प्रत्येक सदस्याला पहिल्या व दुसऱ्या पसंतीचे मत देता येते. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार महापालिकेत शिवसेना आणि भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. यामुळे ही निवडणूक बहुधा बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.

या मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेले रामदास कदम यांना शिवसेनेकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधातील माहिती कदम यांनीच भाजपच्या किरीट सोमय्या यांना पुरविल्याबद्दलची ध्वनिफीत समोर आली होती. तेव्हापासून कदम हे पक्षनेतृत्वाच्या मनातून उतरले आहेत. यामुळे नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल. दुसऱ्या जागेवर गतवेळी काँग्रेसचे भाई जगताप निवडून आले होते. मात्र, त्यानंतरच्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ कमालीचे घटले असून भाजपकडे आवश्यक संख्याबळ आहे.  भाजपमध्येही इच्छुकांची संख्या जास्त असली तरी पालिका निवडणुकीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या उमेदवाराचीच निवड होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील संख्याबळ शिवसेना – ९७

(मनसेतून दाखल झालेले सहा व अपक्ष ३ नगरसेवकांचा पाठिंबा)

भाजप – ८१ (अभासे व अपक्षाचा पाठिंबा ) – दोन सदस्यांच्या निधनाने जागा रिक्त

काँग्रेस – २९

राष्ट्रवादी काँग्रेस – ८

(एक सदस्य अपात्र)

समाजवादी पार्टी – ६

मनसे – १

एमआयएम – २

(सदस्यांच्या निधनाने दोन जागा रिक्त तर एक अपात्र)

मतांचा कोटा कसा ठरतो?

एकूण सदस्य – २३२

तीन जागा रिक्त

मतदानासाठी पात्र – २२९ सदस्य

मताचा कोटा – ७६.३४