पावसामुळे पुन्हा लोकल मंदावली; मशीद रोड स्थानकाजवळ रूळालगत संरक्षक भिंत कोसळली

हार्बर रेल्वेला बसला फटका; रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Mashid Rod accident

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने गुरुवारी सकाळी जोर धरला. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकावर पुन्हा एकदा परिणाम झाला. लोकल सेवा विलंबाने धावत असल्याची माहीती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सकाळी ७.१५ च्या सुमारास मशीद रोड स्थानकादरम्यान रुळाजवळ संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. त्याचा ढिगारा त्वरित हटविण्यात आला. मात्र याचा फटका हार्बर रेल्वेला बसला.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – कर्जत, कसारा मार्गावरील लोकल साधारण १५ ते २० मिनिटे, सीएसएमटी – पनवेल हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – विरार मार्गावरील लोकल १० मिनिटे विलंबाने धावत आहेत. यामुळे सकाळी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

भिंतीच्या मातीचा ढिगारा रुळावर पडला होता –

दरम्यान, सकाळी ७.१६ वाजता मशीद रोड स्थानक ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान डाउन हार्बर मार्गावर सरंक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. कोसळलेल्या भिंतीच्या मातीचा ढिगारा रुळावर पडला होता. यावेळी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्ष आणि अन्य यंत्रणाना दिली. त्यानंतर १५ मिनिटांत मातीटा ढिगारा हटवून हार्बरवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. यामुळे हार्बर लोकलही विलंबाने धावत आहेत.

बेस्ट सेवेलाही बसला पावसाचा फटका –

पावसाचा फटका बेस्ट सेवेलाही बसला आहे. शीव, मालाड, अंधेरी भागात रस्त्यावर पाणी साचल्याने बेस्ट बस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Local slowdown again due to rains the protective wall near the masjid road station collapsed mumbai print news msr

Next Story
वांग्याची भाजी वाढल्याने महिलेची हत्या : उच्च न्यायालयाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा बदलली ; खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत दोषी
फोटो गॅलरी