भूसंपादनाचीच प्रक्रिया सुरू; प्रकल्पपूर्तीसाठी आणखी चार वर्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: पनवेल ते कर्जतदरम्यान नवीन ३० किलोमीटर लांबीच्या दुहेरी उपनगरीय मार्गाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन संथगतीने सुरू आहे. अद्याप ७४ टक्के भूसंपादन झाल्याची माहिती एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) दिली. भूसंपादनाची संथगती आणि मोठय़ा प्रमाणात करावी लागणारी कामे यामुळे पनवेल ते कर्जत लोकल धावण्यासाठी साधारण चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पनवेल ते कर्जत सध्या एकच मार्गिका असून मेल, एक्स्प्रेस किंवा मालवाहतुकीसाठी त्यांचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांसाठी व्हाया ठाणे किंवा कुर्लामार्गे लोकलने जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना मिळू शकतो. त्यासाठी येथे नवीन उपनगरीय मार्गिका बनविण्याचा निर्णय एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) एमयूटीपी ३ अंर्तगत घेण्यात आला. करोनामुळे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली. जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवातही झाली. दुहेरी मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. प्रकल्पातील दुहेरी मार्गाचे काम करण्यासाठी सरकारी, खासगी आणि वन विभागाची मिळून १३५.८९३ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी १०१.०९० हेक्टर जमिमनीचे भूसंपादन झाले आहे. साधारण ७४.३९ टक्के भूसंपादन झाले असून २५.६१ टक्के भूसंपादन बाकी आहे.  या प्रकल्पात पादचारी पुलांसह अन्य काही कामांना सुरुवात झाली आहे. या मार्गात तीन बोगदे असून त्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. यातील एक बोगदा २.६० किलोमीटर लांबीचा आहे. परंतु भूसंपादन  पूर्ण होत नसल्याने कामे रखडली आहेत.

पनवेल ते कर्जत दुहेरी उपनगरीय मार्गिकेची वैशिष्टय़े 

  • मार्गिकेची लांबी – ३० किमी ’ स्थानके- पनवेल, चिकळे, मोहोपे, चौक, कर्जत ’ रेल्वे उड्डाणपूल- दोन
  • मुख्य पूल-सहा ’ लहान पूल- ३७ 
  • रस्ते उड्डाणपूल-पाच
  • बोगद्यांची संख्या- तीन

पनवेल ते कर्जत उपनगरीय दुहेरी मार्गिकेच्या कामाला गती दिली जात आहे. या मार्गिकेसाठी ७४ टक्के भूसंपादन झाले आहे. तसेच अन्य काही कामांना सुरुवातही केली असून या प्रकल्पात तीन बोगद्यांचा समावेश आहे.

– सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एमआरव्हीसी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local system slow project train ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST