कल्याण स्थानकात सोमवारी सकाळी लोकल ट्रेनचा घसरलेला डबा रूळावर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे.मात्र, दरम्यानच्या काळात अनेक गाड्या रद्द झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे अद्यापही या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. गाडी प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावरच असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचे टळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी ९.४३ची कल्याण- सीएसटी लोकल कल्याणच्या १ ए या प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रूळावरून खाली घसरला.  त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच डोंबिवली आणि कल्याण दरम्यानची वाहतुकही जलद मार्गावर वळविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून ट्रेन पुन्हा रूळांवर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  सुरू होते. कल्याण ते डोंबिवली क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले होते आणि परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवून होते. दरम्यानच्या काळात १ आणि १ ए हे प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. कल्याण स्थानकाहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरुन सोडल्या जात होत्या. या सगळ्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. लोकल बंदच पडल्याने गाडीतील प्रवाशांना ट्रॅकवरून चालत कल्याण स्टेशन गाठायला लागले. लोकलमधील सर्व प्रवासी परतल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. सध्या आसनगाव आणि कर्जतकडून येणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना बरीच कसरत करावी लागत आहे. काल मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मात्र, सुट्टीचा दिवस असल्या कारणाने चाकरमन्यांना त्याचा फटका बसला नव्हता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train derail at kalyan railway station
First published on: 01-08-2016 at 10:44 IST