मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील पायाभूत कामांसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

  • कुठे : माटुंगा -मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
  • कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
  • परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद’ मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकानंतर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावर त्यांना पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

ट्रान्स हार्बर मार्ग

  • कुठे : ठाणे -वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
  • कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
  • परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा करण्यात येणार आहेत. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल सेवा, तसेच पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल सेवा रद्द रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : कांदिवली – बोरिवलीदरम्यान अप-डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर
  • कधी : शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सायंकाळी
  • परिणाम : पश्चिम रेल्वेवरील पायाभूत कामांसाठी कांदिवली – बोरिवली स्थानकांदरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री १०.३० पासून रविवारी सायंकाळी ७.३० पर्यंत असेल, तर, अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री १ पासून ते पहाटे ४.३० पर्यंत असेल. धीम्या मार्गावरील ब्लॉकच्या कालावधीत, धीम्या मार्गावरील सर्व लोकल गोरेगाव – बोरिवलीदरम्यान जलद मार्गावरून धावतील. तर, डाऊन जलद मार्गावरील ब्लॉकच्या वेळी, फलाट उपलब्ध नसल्यामुळे डाऊन दिशेकडील लोकल राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर थांबणार नाहीत. या लोकल अंधेरी – बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक १ आणि २ वरून कोणतीही लोकल धावणार नाही. तर, काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. लोकल अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांवर थांबवल्या जातील. १५ डब्यांच्या सर्व धीम्या लोकल अंधेरी आणि बोरिवली दरम्यान दोन्ही दिशांना जलद लोकलप्रमाणे धावतील.