मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमधील महिला डब्यावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मुंबई रेल प्रवासी संघाचे शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाची भेट घेऊन प्रवाशांच्या विविध गंभीर प्रश्नांवर चर्चा केली.
नुकतीच परळ-दादर दरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर जखम झाली. ही घटना म्हणजे प्रवासी सुरक्षेतील मोठे अपयश आहे. त्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी व जबाबदारी निश्चित करणे, पीडित महिलेला नुकसानभरपाई व आयुष्यभर वैद्यकीय सहाय्य, रेल्वे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, आरपीएफचे पथक तैनात करणे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच महिलांसाठी गुलाबी फलाट विभाग तयार करणे, दिव्यांगांसाठी राखीव डब्यांचा गैरवापर थांबवणे यासाठी कडक अंमलबजावणी व सुरक्षा व्यवस्था वाढवणे आवश्यक आहे. पॅरिससारख्या शहरांच्या धर्तीवर बंद दरवाजाचे व योग्य वायुवीजन असलेल्या लोकल सुरू करणे, रेल्वेगाड्यांची संख्या वाढवणे, फलाटाचे रुंदीकरण, कळवा-ऐरोली प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणे, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाच्या महिला प्रवासी विभाग उपाध्यक्ष वंदना सोनावणे यांनी केली.
दादर – रत्नागिरी सुरू करा
दादर – रत्नागिरी पॅसेंजर रद्द करण्याच्या निर्णायाचाही तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. दादर – सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेस, दिवा – रत्नागिरी पॅसेंजर अशा कोकणात जाण्यासाठी केवळ ३ गाड्या आहेत. इतर रेल्वेगाड्या गोवा, कर्नाटक, केरळसाठी असल्याने तिकीटासाठी राखीव आरक्षण देखील इतर राज्यांचा असतो. त्यामुळे कोकणी प्रवाशांवर अन्याय होत आहे.
मुंबई ही कोकणाचाच अविभाज्य भाग असून हजारो मुंबईकर आपल्या गावी जाण्यासाठी या सेवांवर अवलंबून आहेत. त्यामुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजर तात्काळ सुरू करावी, पनवेल-चिपळूण दररोज रेल्वेगाडी सेवा सुरू करावी, कोकणासाठी स्वतंत्र तिकीटासाठी राखीव आरक्षण निश्चित करावे, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या आंदोलनासाठी प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, अशी भूमिका मुंबई रेल प्रवासी संघाने यावेळी मांडली.
महिला प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
- रेल्वे मार्गालगत सुरक्षा वाढवणे
- संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणे
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे
- दोषींवर कठोर कारवाई
