कल्याण – बुधवार सकाळपासून मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, आसनगाव भागातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल अनियमित वेळेत धावत असल्याने रेल्व स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी आणि मिळेल ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांच्या उड्या पडत आहेत.

लोकल उशिरा धावण्याचे कोणतेही कारण रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणेद्वारे देण्यात येत नाही त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. मुसळधार पाऊस नाही, विजांचा गडगडाट नाही, रेल्वे मार्गात कोठेही पाणी तुंबल्याचे प्रकार घडले नसताना लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. नियमित लोकल बरोबर नेहमीच अनियमित वेळेत धावणाऱ्या वातानुकूलित लोकलही सीएसएमटीकडे उशिराने धावत आहेत.

कामावर वेळेत जाण्याची चिंता त्यात लोकल उशिराने असल्याने रेल्वे फलाटांवर प्रवाशांचा संताप पाहण्यास मिळत आहे. लोकल उशिरा धावत असल्याने प्रवाशांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून फलाटांवर रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, लोहमार्ग पोलीस, गृहरक्षकांची संख्या वाढविण्यात आली आहे. अनेक प्रवासी स्थानिक स्टेशन मास्तरना लोकल उशिरा धावण्याचे कारण विचारत आहेत. पण तेही तांत्रिक कारण देऊन वेळ मारून नेत असल्याचे चित्र आहे.

कर्जत, कसारा, आसनगाव, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ भागातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल त्या भागातून प्रवाशांची खचाखच भरून येत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली आणि त्यापुढील प्रवाशांना दरवाजात लटकत प्रवास करावा लागत आहे. कल्याण, डोंबिवलीतून सुटणाऱ्या लोकलही उशिराने धावत असल्याने या लोकलही प्रवाशांची खचाखच भरून जात आहेत. दरवाजात लोंबकळत प्रवास केल्यावर मुंब्रा दुर्घटनेप्रमाणे अपघात होतात हे माहिती असुनही कामावर वेळेवर जाण्याच्या चिंतेने कोणीही अपघात या विषयाचा विचार करताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपली नियोजित लोकल वेळेवर येणार नाही याची जाणीव असल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात येणारी लोकल पकडून मुंबईत जाण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत असल्याचे फलाटावर आणि लोकल आल्यावर दिसत आहे. लोकल का उशिराने धावत आहेत याची उद्घोषणा तरी रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवाव्यात. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत नाही. पण तीही भूमिका प्रशासन वठवत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सामान्य, प्रथम श्रेणी डब्यांमध्ये पाय ठेवण्यास जागा नसल्याने अनेक कर्मचार दिव्यांग डब्यांमध्ये घुसखोरी करून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.