मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील धीम्या, जलद अप-डाऊन मार्गांवरील लोकलचा वेग काहीसा मंदावला आहे. उपनगरीय मार्गावर शीव ते कांजुरमार्ग, भांडुप आणि ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे मार्गादरम्यान रुळांच्या विविध कामांसाठी खबरदारी म्हणून लोकलची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांपासून सीएसएमटी तसेच कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या, जलद लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत आहेत. परिणामी, सकाळी कामानिमित्त लोकलने प्रवास करताना किंवा सायंकाळी कामावरून घरी परताना लोकल गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना फलाटावर बराच वेळ ताटकळत राहावे लागते. धीमी किंवा जलद लोकल नियोजित वेळेपेक्षाही उशिरा स्थानकात येत आहेत. त्यामुळे धीमी लोकल पकडयची की जलद अशा द्विधा मनस्थितीत प्रवासी असतात.

हेही वाचा: “शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये; विचार व्यक्त करायला कृती असावी लागते”; उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा!

मध्य रेल्वेवर काही ठिकाणी नवीन रेल्वे रुळ टाकण्याचे, तसेच त्याखाली खडीची भर घालण्यासह अन्य काही कामांसाठी डाऊन धीम्या मार्गावर शीव ते विद्याविहारदरम्यान प्रति तास ५० किलोमीटर, तसेच घाटकोपर ते कांजुरमार्ग स्थानकांदरम्यान प्रतितास ५० किलोमीटरची वेगमर्यादा घालण्यात आली आहे. या पट्ट्यातून जाणाऱ्या लोकलचा वेग मोटरमनला कमी करावा लागत आहे. ही मर्यादा १८ नोव्हेंबर तसेच २० नोव्हेंबरपर्यंत निश्चित केली आहे. मात्र वेगमर्यादेची मुदत ही वेळोवेळी वाढतच असते. डाऊन जलद मार्गावरही शीव ते कुर्लादरम्यान प्रतितास ३० किलोमीटर, विक्रोळी ते कांजुरमार्ग स्थानकांदरम्यान प्रतितास ५० किलोमीटरची तात्पुरती वेगमर्यादा घालण्यात आली असून ठाकुर्ली ते कल्याण दरम्यानही प्रतितास ६५ चा वेग लोकलसाठी कायम ठेवला आहे.

हेही वाचा: राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्याने पणतू रणजीत सावरकर संतापले, बाळासाहेबांचा दाखला देत प्रत्युत्तर, म्हणाले “शिवसेनेचे वारस…”

अप धीम्या मार्गावरही कल्याण-़ठाकुर्ली, दादर ते परेल धीम्या मार्गावर प्रत्येकी प्रतितास ३० किलोमीटरचा वेग निश्चित आहे. याशिवाय अप जलद मार्गावरही नाहूर-भांडुप स्थानकांदरम्यान प्रतितास ५० आणि शीव स्थानकाजवळ प्रतितास २० किलोमीटरची वेग मर्यादा असल्याने लोकलचा वेग मंदावत आहे. ही वेगमर्यादा २० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रुळ बदलण्यासह विविध कामांसाठी लोकलच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली असून त्यात वेळोवेळी बदलही करण्यात येत आहेत. परंतु यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम होत नसल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Locals slowed down on slow fast up down routes mumbai print news tmb 01
First published on: 17-11-2022 at 13:16 IST