मुंबई, पुण्यात कडक निर्बंध; प्रादुर्भाव नसलेल्या भागांना अंशत: दिलासा

मुंबई महानगर, पुणे परिसरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात सध्या लागू असलेली टाळेबंदी किमान ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी के ली. मुंबई, पुण्यातील निर्बंध अधिक कडक करतानाच करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये अंशत: दिलासा देण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. याबाबत मंगळवारपूर्वी सरकार धोरण जाहीर करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणी संवादाच्या माध्यमातून शनिवारी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्या वेळी राज्यात टाळेबंदीची मुदत वाढविणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले. बैठकीनंतर राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. आता तरी किमान ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी वाढवावी लागत आहे. या काळात परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त के ली. अन्यथा हा कालावधी वाढवावा लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला.

आतापर्यंत सुमारे ३३ हजार चाचण्या घेण्यात आल्या असून, १५७४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. करोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक  असून ज्या भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत, तो भाग प्रतिबंधित करण्यात येत असून तेथे घरोघरी जाऊन बाधितांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच त्या भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दूध, भाजीपाला, धान्य, औषधे यांचा पुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

टाळेबंदीच्या पुढील काळात उद्योग, शालेय तसेच महाविद्यालयीन परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. करोनावरून राज्यात विरोधकांकडून सुरू असलेल्या पक्षीय राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी या वेळी तीव्र नाराजी व्यक्त के ली. आयुष्यभर राजकारणच के लात, मात्र ही राजकारण करण्याची वेळ नसून हे इथेच थांबले पाहिजे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

आर्थिक मदतीची मागणी

करोनाच्या महासाथीशी लढण्यासाठी केंद्राने आर्थिक मदत करावी, अशी मागणी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. टाळेबंदीचा छोटय़ा व मध्यम उद्योगांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांना केंद्राने अर्थसाह्य़ केले पाहिजे. उद्योग व शेतीक्षेत्राला आर्थिक सवलती जाहीर कराव्यात, राज्यांना वित्तीय तुटीच्या नियमातून सवलत देऊन बाजारातून अधिक पैसे उभे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

राज्यात आणखी १७ बळी

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाने १७ जणांचा बळी घेतला. त्यामुळे राज्यातील करोनाबळींची संख्या १२७ वर पोहोचली. राज्यभरात करोनाबाधितांची एकूण संख्या १७६१ झाली. कोरोनाबाधित २०८ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात सध्या १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत १७ जण मृत्युमुखी पडले. त्यात मुंबईतील १२, पुण्यातील दोन, सातारा, धुळे आणि मालेगावमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

देशभर मुदतवाढीचे पंतप्रधानांचे संकेत

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत वाढविण्याची मागणी अनेक राज्यांनी शनिवारी पंतप्रधानांकडे केली. त्याबाबत पंतप्रधानांनी अनुकूलता दर्शवल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

देशभरातील तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र, करोनाच्या संसर्गाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदी हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे किमान १५ दिवसांसाठी तरी टाळेबंदी वाढवण्याची आग्रही मागणी १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत केली. त्यावर मोदी यांनी सहमती दर्शवली. करोनासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेली ही मुख्यमंत्र्यांची तिसरी बैठक आहे. ही बैठक तब्बल चार तास चालली. सध्याच्या २१ दिवसांच्या टाळेबंदीमध्ये अर्थकारणावर मोठे निर्बंध आले आहेत. आर्थिक क्षेत्राला बसत असलेला प्रचंड फटका लक्षात घेता वाढीव टाळेबंदीत उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राचा तसेच शेतीच्या कामांचा अपवाद केला जाऊ  शकतो.