मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सांस्कृतिक विश्वची टाळेबंदीतून सुटका झाल्याने आर्थिक गणिते जुळत नसतानाही रसिक प्रेक्षकांना सांस्कृतिक कार्यक्रमांकडे वळवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सांस्कृतिक विश्वला ऊर्जा देणाऱ्या ‘दिवाळी पहाट’ आणि ‘दिवाळी संध्या’ या कार्यक्रमांसाठी यंदा आयोजकांनी पदरमोड केली असून कलाकारांनीही मानधनाच्या बाबतीत तडजोड केली आहे. गतवर्षी टाळेबंदीमुळे अनेक आयोजकांनी ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम रद्द केले तर काहींनी ते ऑनलाइन केले होते.

अशा कार्यक्रमांचे आयोजन काही महिने आधी केले जाते. यंदाही हे कार्यक्रम ऑनलाइन करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय काही आयोजकांनी घेतला होता; मात्र ऐनवेळी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळाल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम करण्याकडेच अधिक कल दिसून येत आहे. अनेक उद्योग नुकतेच सुरू झाल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रायोजकत्व देताना त्यांनी हात आखाडता घेतला आहे. अशा वेळी आयोजकांना स्वखर्चाने कार्यक्रम करणे भाग पडले आहे.

‘जीवनगाणी’ने २, ३ नोव्हेंबरला दहिसर, जोगेश्वरी येथे ‘दिवाळी संध्या’, तर ४, ५ नोव्हेंबरला वांद्रे, दादर येथे ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले आहे. ‘५० टक्के प्रेक्षकांमध्ये कार्यक्रम करावा लागणार असून प्रायोजकांकडेही फारशी आर्थिक तरतूद नाही; मात्र कलाकारांनी समजूतदारपणा दाखवत कमी मानधनात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. कार्यक्रम सादर होणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत आहे,’ असे ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर यांनी सांगितले.

नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेनेही ५ नोव्हेंबरला कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत आयोजकांना खात्री वाटत नसल्याने परिषदेच्या समिती सदस्यांनीच कार्यक्रमाचा भार उचलल्याची माहिती समिती सदस्य प्रशांत जोशी यांनी दिली. नाट्यगृहाच्या भाड्यात सवलत मिळवण्यासाठी तिकिटाच्या किंमतीला मर्यादा आहेत असे आयोजक सुबोध खेर यांनी सांगितले. त्यांचे मुख्य आयोजक भूषण पाटील यांनी कार्यक्रमाचा बराचसा आर्थिक भार उचलला आहे. शिवाय कलाकारांकडूनही सहकार्य मिळत आहे.

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ म्हणून ‘मराठी बाणा’चे प्रयोग आयोजित करण्यात येतात. ५० टक्के प्रेक्षक क्षमतेत हा कार्यक्रम करणे परवडत नसल्याचे अशोक हांडे यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या बाजूला बोरिवली आणि विलेपार्ले येथील प्रयोगांच्या तिकिटांची विक्री ‘बुक माय शो’वर सुरू  केल्यानंतर प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कार्यक्रमासाठी उत्साह असल्याचे दिसत आहे.

‘सभागृहाचे भाडे, कलाकारांचे मानधन अशा अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. अद्याप अर्थचक्राला गती मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून न बघता आयोजक त्यांच्या परीने तयारी करीत आहेत. कलाकारही कमी मानधनात काम करण्यास तयार आहेत.’ – गिरीश छत्रे,  ‘स्वरदा’