प्रत्येक ठिकाणी दहा हजारांहून अधिक ‘नोटा’

या निवडणुकीत नोटा हा पर्याय निर्णायक ठरला नसला तरी नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे

(संग्रहित छायाचित्र)
पालघरमध्ये २९ हजार मतदारांनी उमेदवार नाकारले; मुंबईत ‘नोटा’ला तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाची मते

मुंबई : विजेत्यांच्या आनंदोत्सव आणि पराभूतांची हळहळ या सगळ्यांपासून फारकत घेत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांबाबत नापसंती दर्शवणाऱ्या मतदारांची संख्या यावेळी मुंबई महानगरात वाढली आहे. मुंबई आणि ठाण्यातील मतदारसंघांमध्ये प्रत्येक ठिकाणी १० हजारांपेक्षा अधिक मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला. पालघरमध्ये सर्वाधिक म्हणजे २९ हजारपेक्षा अधिक मतदारांनी नोटा वापरले.

गेल्या निवडणुकीला म्हणजे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ‘वरील पैकी कोणीही नाही, म्हणजेच ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून दिला. गेल्या निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघांमध्ये हा पर्याय निर्णायक ठरला होता. गेल्या निवडणुकीतही मुंबईकरांनी नोटाचा वापर केला होता. दक्षिण, उत्तर, वायव्य, दक्षिण मुंबई मतदारसंघात ८ ते १० हजार मतदारांनी, तर पालघरमध्ये साधारण २१ हजार मतदारांनी एकही उमेदवार पसंत नसल्याचे दर्शवले होते. या निवडणुकीत नोटा हा पर्याय निर्णायक ठरला नसला तरी नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या ४ ते ८ हजारांनी वाढली आहे. एकूण मतदानापैकी जवळपास दीड टक्के मतदारांनी ‘नोटा’ निवडले आहे. मुंबई महानगरातील दहा मतदारसंघांपैकी उत्तर-मध्य मुंबई आणि कल्याण हे दोन मतदारसंघ वगळता राहिलेल्या आठ मतदारसंघांत नोटा निवडणाऱ्या मतदारांची संख्या ही १० हजारांपेक्षा अधिक आहे. बहुतेक ठिकाणी लहान पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा नोटाचा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

‘नोटा’ हा उत्तम पर्याय

नोटा हा उत्तम पर्याय आहे. हा प्रत्येक नागरिकाला आपल्या सोयीने वापरता येतो. अनेकदा आपल्या आवडीचा पक्ष नसल्याने किंवा चुकीचा उमेदवार असल्याने इच्छेविरोधात मत देण्याची वेळ येते. परंतु चुकीच्या व्यक्तीला मत देण्यापेक्षा ‘नोटा’मुळे आपल्या मताला एक वेगळे सामर्थ्य मिळते, असे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. उत्तरा सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

मतदारसंघ आणि नोटाचे वापरकर्ते (टक्केवारी)

’ पालघर – २९४६३ (२.४५)

’ दक्षिण मुंबई – १४९१२ (१.८८)

’ दक्षिण-मध्य मुंबई -१३७९५ (१.७३)

’ वायव्य मुंबई – १३३३० (१.९१)

’ ठाणे – १३०३३ (१.७)

’ भिवंडी – १२७८७ (१.६१)

’ ईशान्य मुंबई – १२४४६ (१.३७)

’ उत्तर मुंबई – ११५६५ (१.२२)

’ उत्तर-मध्य मुंबई – ९९५५ (१.१९)

’ कल्याण – ८८०२ (१.५९)

(आकडेवारी अंतिम नाही)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lok sabha election 2019 more than ten thousand nota vote in mumbai