‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’ची धामधूम सध्या जोरात सुरू झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण रंगकर्मी या प्रतिष्ठेच्या आणि कला क्षेत्राची कवाडे उघडणाऱ्या स्पर्धेच्या तयारीत गुंतले आहेत. दुग्धशर्करा योग म्हणजे गुजराती रंगभूमी आणि हिंदूी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, भारतीय रंगभूमीची गंगोत्री मानल्या जाणाऱ्या दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे अध्यक्ष परेश रावल हे ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’च्या महाअंतिम फेरीला प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. त्यांच्या साक्षीने युवा रंगकर्मीना आपली रंगप्रतिभा दाखविण्याची सुसंधी प्राप्त होणार आहे. स्पर्धेची प्रवेशिका भरण्यापासून ते एकांकिकेची निवड, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांची जुळवाजुळव, तालमी यांची एकच धांदल सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, पॉवर्ड बाय पार्टनर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, आयरिस प्रॉडक्शन (टॅलेन्ट पार्टनर) आणि ‘अस्तित्व’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला परेश रावल यांची लाभणारी उपस्थिती त्यांच्या थिएटरवरील निखळ प्रेमाखातर असणार आहे. ‘थिएटर हे माझे पहिले प्रेम आहे. तिथे माझ्या अभिनय कौशल्याला धार येते. चित्रपटांमध्ये जरी पैसे आणि नाव मिळत असले तरीही आपल्या सर्जनशील कामाचे समाधान फक्त आणि फक्त रंगभूमीवरच मिळते,’ असे जाहीरपणे मान्य करणारे परेश रावल गेल्या चार दशकांहून अधिक काळ रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात सक्रिय आहेत. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले आणि मग त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘झूठ बोले कव्वा काटे’, ‘ठोकर’, ‘डिअर डॅडी’, ‘किशन व्हर्सेस कन्हैय्या’ (ज्याच्यावर आधारित पुढे ‘ओ माय गॉड’ हा ब्लॉकबस्टर हिंदूी सिनेमा निघाला होता!), ‘खेलिया’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी रंगभूमी गाजवली. मराठी रंगभूमीचे ते मोठे चाहते आहेत. त्यांचे ‘डिअर डॅडी’ हे नाटक लेखक विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ या मूळ मराठी नाटकावर बेतलेले आहे. मराठी नाटके ते आवर्जून पाहतात. त्यातील आशय, विषय, सादरीकरण त्यांना खूपच भावते. गुजराती आणि मराठी रंगभूमीवरील हे आदानप्रदान परेश रावल यांना मराठी रंगभूमीप्रति असलेल्या आदर आणि प्रेमातूनच आकाराला आलेले आहे. मराठी रंगभूमीवरील अनेक कलावंतांशी त्यांचा जडलेला घनदाट स्नेह ही याचीच साक्ष होय. रंगभूमीवरील त्यांच्या प्रभावी कामगिरीची दखल घेत हिंदूी चित्रपटांची दारे त्यांना खुली झाली. ‘वो छोकरी’, ‘सर’, ‘नाम’, ‘हेराफेरी’, ‘चाची ४२०’, ‘उरी’, ‘गोलमाल’, ‘जिल्हा गाझियाबाद’, वल्लभभाई पटेलांवरील ‘सरदार’ अशा २४०हून अधिक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सुरुवातीला खलनायकाची भूमिका करणाऱ्या परेश रावल यांनी पुढे विनोदी भूमिकांतूनही आपली वेगळी छाप पाडली. चित्रपटांतील कामगिरीसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. टीव्हीचा छोटा पडदाही त्यांनी वज्र्य मानला नाही. तिथेही त्यांनी आपल्या ‘हटके’ भूमिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या कला क्षेत्रातील या यशस्वी कारकीर्दीवर ‘पद्माश्री’ किताबाची मोहोरही उमटली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokankika grand finale ceremony paresh rawal amy
First published on: 13-11-2022 at 00:07 IST