क्रिकेटशौकिनांच्या विश्वचषकाच्या उत्सवी जल्लोषात साप्ताहिक ‘लोकप्रभा’नेही विश्वचषक विशेषांकाने रंग भरले असून या अंकातील विविध लेखांमधून भरपूर माहिती, फोटोंचा नजराणा क्रिकेटवेडय़ा वाचकांसाठी पेश केला आहे.
mu15ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या यंदाच्या विश्वचषक सामन्यांमधून अनेक नवीन विक्रम होण्याची तसेच जुने विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. ‘विश्वचषक ठरणार विक्रमचषक’ या लेखातून त्याचा वेध घेतला आहे प्रसाद लाड यांनी. गेला विश्वचषक ‘टीम इंडिया’ने मोठय़ा दिमाखात जिंकला होता, तर या वेळी विश्वचषकाचा मानकरी कोणता संघ ठरू शकेल, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या वेगवेगळ्या संघांची सामथ्र्यस्थळं आणि मर्यादा काय आहेत, याविषयी वाचायला मिळेल ‘अ‍ॅण्ड द विनर इज..’ या प्रशांत केणी यांच्या लेखातून.
‘टीम इंडिया’ या लेखातून पराग फाटक यांनी भारतीय संघातल्या सगळ्या खेळाडूंची, त्यांच्या क्षमतांची ओळख करून दिली आहे; तर मिलिंद ढमढेरे यांनी ‘कांगारूंचे प्राबल्य असलेली स्पर्धा’ या लेखातून विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासाचा आढावा घेतला आहे.
सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, अंकुश चौधरी, मनवा नाईक या सेलिब्रिटींनी त्यांचं आणि क्रिकेटचं नातं उलगडून दाखवलं आहे. त्यांच्यासोबतच तरुणाईनेही या विश्वचषकाच्या जल्लोषात आपला सूर मिसळला आहे. सोबत विश्चषकाचे पूर्ण वेळापत्रक आहेच.