मुंबई : व्यंगचित्र हे चित्रकलेतील एक महत्त्वाचे अंग. गेल्या काही वर्षांत आपल्या साहित्यिक-सामाजिक पर्यावरणामध्ये या कलेस एक नवी टवटवी प्राप्त झाल्याचे दिसते. व्यंगचित्रांचेच आधुनिक रूप असलेले ‘मीम’ हे त्याचे एक उदाहरण. आजच्या काळातील नवतरुणांच्या अभिव्यक्तीचे, त्यांच्या संघर्षाचे, असंतोषाचे, संतापाचे विनोदाच्या मुशीतून घडलेले रसरशीत साधन म्हणून आज व्यंगचित्रे समोर येत आहेत.
सामाजिक व्यंगांवर, विसंगतींवर, दांभिकतेवर रेषा आणि शब्दांच्या माध्यमांतून तिरकस टिप्पणी करणार्या आणि इवल्याशा रेषांमधून लोकांना अंतर्मुख करण्याची अद्भूत क्षमता असलेल्या या व्यंगचित्रांना या वर्षीच्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये आवर्जून स्थान देण्यात आले आहे. यंदाच्या ‘लिटफेस्ट’चे हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ‘लोकसत्ता’तर्फे नवोदित व्यंगचित्रकारांसाठी खास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
साहित्यिक, सांस्कृतिक, कलात्मक, वैचारिक अशा श्रीमंत आणि धीमंत उपक्रमांनी नटलेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे यंदाचे हे दुसरे पर्व. पहिल्याच वर्षी मराठीच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वात आपला ठसा उमटवणार्या या ऐश्वर्यसंपन्न सोहळ्यास येत्या १९ नोव्हेंबरपासून शुभारंभ होत आहे. या निमित्ताने यंदा ‘लोकसत्ता’ने व्यंगचित्रकारांसाठी ही खास स्पर्धा आयोजित केली आहे. सर्व नवोदित व्यंगचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, स्पर्धेतील विजेत्या, तसेच काही निवडक कलाकृतींचे प्रदर्शन ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये भरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कलाकृतींना ‘लोकसत्ता’तून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी व्यंगचित्रकारांनी येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत आपली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक या विषयांवरील व्यंगचित्रे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या या abhijaatlitfest@gmail.com संकेतस्थळावर पाठवायची आहेत. ही व्यंगचित्रे ‘ए-फोर’ कागदाच्या आकारात, ‘पीडीएफ’ (पोर्टेबल डॉक्युमेन्ट फॉर्मॅट) या प्रकारातच पाठवावीत. व्यंगचित्रे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारी वा कोणा व्यक्तीच्या शारीरिक व्यंग, अपंगत्व यांवर नसावीत. अशा प्रकारची व्यंगचित्रे विचारात घेतली जाणार नाहीत.
महत्त्वाचे…
’विषय : राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक
’आकार : ए-फोर (पीडीएफ)
’अंतिम मुदत : २५ ऑक्टोबर
’स्पर्धा सर्व नवोदित व्यंगचित्रकारांसाठी खुली
मुख्य प्रायोजक : सारस्वत को – ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
सहप्रायोजक : केसरी टूर्स
सहाय्य : कौटिल्य मल्टी क्रिएशन, वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
