मुंबई : कुमारवयीन मुले! आजच्या भाषेत ‘जेन-अल्फा’ म्हणतात ती ‘जडणघडणी’च्या वाटेवरची पिढी. या पिढीचे विचार, त्यांच्या कुतूहलाचे आणि नवलाईचे विषय, त्यांच्या आकर्षणाची केंद्रे हे सगळेच वेगळे. खास या मुलांसाठी आणि अर्थातच ते ज्यांना ‘सांभाळून’ घेतात त्या त्यांच्या पालकांसाठी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ यंदा दोन विशेष कार्यक्रमांची भेट घेऊन येत आहे. ते आहेत ‘अचंब्याच्या गोष्टी’ आणि ‘पोरवयातली गाणी’. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आणि लेखक-अभिनेते संदेश कुलकर्णी ‘अचंब्याच्या गोष्टी’ सादर करणार आहेत, तर ‘पोरवयातली गाणी’ ही मैफल सजवणार आहे गाजलेल्या गायकांची पुढची पिढी. बालसाहित्यिक डॉ. संगीता बर्वे या गीतमैफलीचे सूत्रसंचालन करणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे खास लोकसत्ता अभिजात लिटफेस्टसाठी त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘अचंब्याच्या गोष्टी’ कार्यक्रम आहे अडनिड्या वयातल्या जाणीवांच्या कथांचा. सुप्रसिद्ध लेखक सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केलेल्या याच नावाच्या कथासंग्रहातील आणि अन्यही काही कथांचे अभिवाचन यात अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी करणार आहेत. या कथा आहेत आजच्या अत्यंत वेगवान, तंत्रज्ञानसंपृक्त अशा युगातील मुलांचे त्यांच्या भवतालाविषयीचे निरीक्षण, त्यांचे आनंद, वेदना, जाणीवा यांविषयीच्या, प्रकाश नारायण संत यांच्यासारख्या मराठीतील नामवंत लेखकांनी लिहिलेल्या. नाट्यमय अभिवाचनातून अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी या कथा ‘लिटफेस्ट’च्या मंचावर साकारणार आहेत.
‘पोरवयातली गाणी’ हा बालगीतांचा कार्यक्रम, परंतु नेहमीच्या कार्यक्रमांहून वेगळा. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, विंदा करंदीकरांचे ‘एटू लोकांचा देश’, गुलजारांची ‘लकडी की काठी’, तसेच ‘मास्टरजी की आई चिठ्ठी’ अशा अनेक बालगीतांना स्वरांकीत करणार आहे गाजलेल्या गायकांची पुढची पिढी. ‘उजेडाचा गाव’, ‘गंमत झाली भारी’, ‘दिवसाच्या वाटेवरून’ अशा काव्यसंग्रहांतून बाल-कुमारांच्या भावभावनांना शब्द देणार्या डॉ. संगीता बर्वे ‘पोरवयातली गाणी’चे सूत्रसंचालन करणार आहेत. बाल आणि कुमारवयीन मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही स्मरणरंजनाचा वा पुन:प्रत्ययाचा आनंद देणार्या या दोन कार्यक्रमांबरोबरच ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या साहित्योत्सवामध्ये यंदा संगीत, नाटक, साहित्यिक आणि वैचारिक परिसंवाद असे विविधरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
