मुंबई : माणदेशच्या मातीने मराठी साहित्याला दिलेली दोन रत्ने म्हणजे माडगूळकर बंधू. थोरली पाती गदिमा तथा ग. दि. माडगूळकर आणि धाकटी पाती व्यंकटेश माडगूळकर. या दोन्ही बंधुंच्या साहित्याने, त्यांच्या कथांनी मराठी रसिकांना भरभरून आनंद दिला. हा आनंद पुन्हा अनुभवण्याची अनोखी संधी या वर्षीच्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधून रसिकांना मिळणार आहे.
‘माडगूळकर बंधू’ या शीर्षकाच्या कथाकथन-मालिकेत या दोन्ही लेखकांच्या खास निवडक कथा दररोज सादर करणार आहेत मराठीतील काही मातब्बर व लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्री. खास ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’साठी या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘करुणाष्टक’, ‘माणदेशी माणसं’, ‘सत्तांतर’, ‘बनगरवाडी’ या अभिजात साहित्यकृतींमुळे अजरामर झालेले कथाकार, कादंबरीकार (आणि चित्रकारही) व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षास यंदा प्रारंभ होत आहे. तर ‘गीतरामायणा’मुळे मनामनांत पोचलेले, ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून गौरवले गेलेल्या सिद्धहस्त कवी-गीतकार, कादंबरीकार गदिमा आपल्यातून गेले त्यास आता अर्धशतक होत आले आहे. या निमित्ताने मराठी साहित्यातील या दोन शिखरांना ही खास मानवंदना देण्यात येत आहे.
या कार्यक्रमात, माडगूळकर बंधुंच्या कथा सादर करणार आहेत माधुरी पुरंदरे, चिन्मयी सुमीत, ऐश्वर्या नारकर, प्रतीक्षा लोणकर, अनिता दाते, कविता लाड, मृणाल कुलकर्णी, मुग्धा गोडबोले, स्पृहा जोशी, संपदा जोगळेकर, श्वेता पेंडसे, पर्ण पेठे, स्वानंदी टिकेकर, त्याच प्रमाणे चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, मकरंद अनासपुरे, अविनाश नारकर, तुषार दळवी, पुष्कर श्रोत्री, संकर्षण कर्हाडे, मिलिंद शिंदे, अभिजित खांडकेकर, सागर कारंडे, हे साहित्यप्रेमी कलावंत.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन या कार्यक्रमास लाभले आहे. ‘लिटफेस्ट’च्या कालावधीत रोज हा कार्यक्रम सादर केला जाणार असून, त्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कलावंत कथाकथन करणार आहेत. माणसाला माणूसपण देण्यात महत्त्वाचे योगदान असते ते साहित्याचे. पहिल्या शतकातील हाल सातवाहनाच्या ‘गाहासत्तसई’पासून महाराष्ट्रात सुरू झालेला मराठी वाङ्मयाचा प्रवाह आजही अविरत वाहत आहे. त्यात अनेक नवनवे प्रवाह मिसळून त्याचा महानद बनलेला आहे.
असंख्य दिग्गज, मातब्बरांच्या योगदानातून आजचे आपले समृद्ध वाङ्मय विश्व आकारास आले आहे. त्यातील हे दोन थोर साहित्यिक. याबरोबरच, ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ असे सांगत आपल्या काव्यातून श्रमिकांचा, कामगारांचा जाहिरनामा मांडणारे कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रमही या साहित्य उत्सवात आयोजित करण्यात आला आहे. आपल्या बेधडक शैलीतून महानगरीय जगण्याच्या तिरकस चौकटी मराठीच्या दालनात मांडून ‘राडा’ माजवणारे ‘बंडखोर’ कथा-कादंबरीकार म्हणजे भाऊ पाध्ये. त्यांच्या ‘वासुनाका’ या कादंबरीने एका ‘लुंपेन मुंबई’चे दर्शन समाजास घडवले. त्यांना आदरांजली वाहताना त्या मुंबईचे काय झाले, यावर चर्चा करणारा ‘वासुनाक्यानंतरची मुंबई’ हा विशेष परिसंवादही लिटफेस्टमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
