उत्तरासाठी दादरमध्ये मंगळवारी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम

काळ्या पैशाविरूद्ध लढाईसाठी सरकारने उचललेल्या निश्चलनीकरण अस्त्राने सचोटी, पारदर्शकता व नियमानुसार चालणाऱ्या गुंतवणूक जगतालाही या निर्णयाने संभ्रमात लोटले. नोटाबंदीने गुंतवणूकदारांसमोर उभ्या केलेल्या कोडय़ाची उकल ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या उपक्रमातून येत्या मंगळवारी दादरमध्ये आयोजित परिसंवादातून केली जाणार आहे.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकदार मार्गदर्शनाच्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाचे हे सत्र मंगळवार, ३१ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई  येथे आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला होत  असलेल्या या कार्यक्रमांतून, नोटाबंदीतून साधल्या गेलेल्या आर्थिक परिणामांतून निर्माण झालेल्या कुटुंबाच्या अर्थनियोजन आणि गुंतवणुकीच्या समस्यांचे निराकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

बाजारात अस्थिरता असताना गुंतवणुकीचे धाडस करायचे तर कुठे, असा सर्वसामान्यांपुढे पेच आहे. त्यासाठी उपलब्ध पर्यायांविषयी या चर्चासत्रात सनदी लेखाकार तृप्ती राणे या उहापोह करतील. बचत आणि गुंतवणूक ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत्या जबाबदाऱ्यांसह उत्पन्न, खर्च यांचा मेळ राखत आर्थिक नियोजनाची घडी यातून बसवली जाऊ शकते हे त्या सोदाहरण पटवून देतील.

तर म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’द्वारे सुरू झालेला नियमित गुंतवणुकीचा शिरस्ता सद्यस्थितीत  मोडला जाऊ नये, हे ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे’ या विषयातून अर्थसल्लागार सुयोग काळे समजावून सांगतील. गुंतवणुकीचा सध्याच्या या सर्वात लोकप्रिय पर्यायाबाबत आपले धोरण कसे असावे, कोणत्या फंड प्रकारात सध्या गुंतवणूक उपयुक्त ठरेल आणि फंडांची निवड कोणत्या निकषावर करावी यावर ते प्रकाश टाकतील. तज्ज्ञ वक्त्यांना या कार्यक्रमांत आपले गुंतवणूकविषयक प्रश्न विचारण्याची उपस्थितांना संधी मिळेल.

untitled-25