scorecardresearch

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये नवउद्यमाचा नवा मंत्र!

या चर्चासत्राचा समारोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे.

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये नवउद्यमाचा नवा मंत्र!

मंगळवारी नामवंतांच्या उपस्थितीत उद्घाटन

नवउद्योग उभारताना नेमकी कोणती काळजी घ्यायची, उद्योग यशस्वी करण्यासाठी काय करावे इथपासून ते महाराष्ट्रातील वातावरण नवउद्योगासाठी पूरक आहे की नाही यावर ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, ३० नोव्हेंबर रोजी सविस्तर चर्चा होणार आहे. हा परिसंवाद ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर लिमिटेड’ यांच्या सहकार्याने होत असून कार्यक्रम पॉवर्डबाय ‘केसरी’ आहे. या कार्यक्रमाला टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी २४ तास’ची साथ लाभली आहे.

‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात ‘पर्व स्टार्टअपचे..’ या परिसंवादाचे मंगळवारी, २९ नोव्हेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी, ३० नोव्हेंबर रोजी ‘स्टार्ट-अप सुरू करताना’ या पहिल्या सत्रात स्टार्टअप सुरू करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची, आपल्या शिक्षणव्यवस्थेत स्टार्टअपची मानसिकता रुजवण्याची गरज याचबरोबर कृषी क्षेत्रातील नवउद्योग संधी व नोकरी सोडून व्यवसायाची वाट धरतानाचा अनुभव आदी मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आयआयटीमधील साइन या संस्थेचे प्रा. मिलिंद अत्रे, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि ओपंडित डॉट कॉमच्या संस्थापक मृदुला बर्वे सहभागी होणार आहेत. तर एकीकडे मोठय़ा प्रमाणावर नवउद्योग बंद पडत आहेत तर दुसरीकडे अनेक उद्योगांना नफा कमाविणे अवघड झाले आहे. मात्र यापेक्षा वेगळे ठरत यशस्वी नवउद्योग उभारून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुविधाचे संस्थापक परेश राजदे, इंडस ओएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक राकेश देशमुख आणि एम इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके ‘यशाचे गमक’ या परिसंवादात त्यांच्या यशाचे सूत्र सांगणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्टार्टअप इंडिया’ या योजनेच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यानेही नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजनांची आखणी केली आहे. मात्र, या योजनांचा खरोखरीच फायदा झाला का, केवळ योजना पुरेशा आहेत की त्याला पूरक वातावरण निर्माण करणेही आवश्यक आहे याबाबत अर्थतज्ज्ञ दीपक घैसास, बीज भांडवलदार महेश मूर्ती आणि प्रा. दीपक फाटक ‘स्टार्टअप महाराष्ट्राची वाटचाल’ या चर्चासत्रात उहापोह करणार आहेत. या चर्चासत्राचा समारोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे.

विद्यार्थी व नवउद्यमींसाठी आवाहन

  • महाविद्यालयीन विद्यार्थी व होतकरू नवउद्यमींना दिशा देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या दोन दिवसीय परिसंवादात सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणांहून चौकशी होत आहे मात्र जागा मर्यादित असल्यामुळे प्रवेशासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
  • यासाठी इच्छुक विद्यार्थी व होतकरू नवउद्यमींनी आज, शनिवारी दुपारी २ ते ६ यावेळेत ‘लोकसत्ता’ कार्यालयात ०२२-६७४४०५३६ या क्रमांकावर पूर्व नोंदणी करावी.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या