‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात परिसंवाद; केंद्रीय उर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन 

रोजच्या जगण्यात आपला ऊर्जा क्षेत्राशी येणारा संबंध हा वीजटंचाई.. भारनियमन.. सौरऊर्जा.. अशाच त्रोटक शब्दांपुरता मर्यादित असला तरी या क्षेत्राची व्याप्ती मात्र आवाढव्य आहे. आपल्या जगण्याला व्यापून टाकणाऱ्या या क्षेत्राची आजची स्थिती, त्याचा अपेक्षित विकास, त्या विकासमार्गावरील आव्हाने, अडचणी यांचा लेखाजोखा ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत येत्या २६ व २७ जून रोजी मांडण्यात येणार आहे. या उपक्रमातील ‘ऊर्जेची प्रकाशवाट’ या नव्या पर्वात ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक सहभागी होणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप होईल. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या क्षेत्राबाबत मार्गदर्शन करतील. ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात राज्याशी संबंधित विविध विषयांचा वेध घेतला जातो. त्या त्या क्षेत्रातील आव्हाने, अडचणी आदींबाबत तज्ज्ञ, अभ्यासक आणि राजकीय मंडळींची मते जाणून घेऊन ती धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. त्यानुसार आतापर्यंत या उपक्रमात शेती, उद्योग, पर्यावरण, महिलांचे प्रश्न अशा विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. त्यातील नवे पर्व ‘ऊर्जा’ या विषयावर आधारित आहे. येत्या २६ व २७ जून रोजी प्रत्येकी तीन परिसंवाद होतील.

दिवस पहिला

पहिल्या दिवशी ऊर्जा क्षेत्राची सद्य:स्थिती व आव्हाने यांचा मागोवा घेतला जाईल. ‘प्रयास’चे अध्यक्ष शंतनू दीक्षित, राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे त्यात सहभागी होतील. वीज क्षेत्राच्या नियमनाबाबत ‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत देव, ‘सीआयआय’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष निनाद करपे, माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील हे ऊहापोह करतील, तर पर्यायी ऊर्जास्रोतांच्या विकासवाटांबाबत जैन इरिगेशन्सचे ए बी जैन, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ गजानन जोशी, पॉवर बॅकअप व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ शैलेश संसारे मार्गदर्शन करतील.

दिवस दुसरा

दुसऱ्या दिवशी ऊर्जा क्षेत्राच्या दिशेबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे माहिती देतील. ऊर्जानिर्मितीच्या पर्यायी मार्गाबाबत अणुऊर्जा शिक्षण परिषदेचे सचिव एस के मल्होत्रा, आयआयटीतील प्रा. श्याम असोलेकर, ‘आर्टी’चे अध्यक्ष आनंद कर्वे हे चर्चा करतील. ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव अरविंद सिंग, वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे, ‘ऊर्जा प्रबोधिनी’चे मुंबई समन्वयक पुरुषोत्तम कराडे हे ऊर्जेचे दर व अनुदान यावर ऊहापोह करतील. सौरखेडय़ाचा प्रयोग करणारे अरुण देशपांडे, अपारंपरिक ऊर्जा उत्पादनांचे संशोधक केदार पाठक व ‘वर्षांसूक्त’च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रलेखा वैद्य हे ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन प्रयोग व संकल्पनांचा परिचय करून देतील.