युवकांमधील विचारशीलता जागृत राहण्यासाठी लेखन करणे आवश्यक असून खास युवकांसाठी सुरू झालेला ‘ब्लॉग बेंचर्स’चा उपक्रम ही चांगली संधी आहे, असे मत माटुंग्याच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थी व ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या मयूर पाटील याने व्यक्त केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या पारितोषिक वितरण समारंभावेळी तो बोलत होता. संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र व पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
आठव्या लेखाला यश
‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये मी सात वेळा लेखन केले होते. सातही वेळा मला यश मिळाले नाही, मात्र मी लेखनात सातत्य ठेवले आणि आठव्या वेळी ‘सडक्यातले किडके’ अग्रलेखावर मत व्यक्त केले, तेव्हा मला यश मिळाले आहे. त्यामुळे लेखनात सातत्य ठेवणे ही महत्त्वाची बाब असल्याचे मयूर याने उपस्थितांना सांगितले.