‘देखता मृगजळाचे पूर..’ या आठवडय़ासाठीचा नवा विषय!

यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी यांनी शहरातील गुळगुळीत रस्ते सोडून देत गडय़ा आपुला गाव बरा या उक्तीप्रमाणे खेडय़ातील धुळीची वाट पत्करली, यांमुळे अर्थसंकल्पात शहरी व ग्रामीण दोन्हीसाठींच्या तरतुदींचे संतुलन डळमळीत झाल्याच्या मुद्दय़ावर सडेतोड भाष्य करणारा ‘देखता मृगजळाचे पूर..’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

पंतप्रधान मोदींनी यंदाच्या अर्थसंकल्पात शहरी भागाला काहीसे झुकते माप देत ग्रामीण भागावर आपली मेहेरनजर केल्याच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांना मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्मार्ट शहरे आदी चमचमीत घोषणांच्या मागे लागून फारसे काही लागणार नाही हे समजले आहे. दिल्ली, बिहार आदी राज्यांतील निवडणुकांत बसलेला फटका आणि अगामी चार राज्यांतील निवडणुकांत त्याच्या पुनरावृत्तीची शक्यता यामुळे मोदी यांना हे भाने आले आणि त्यांनी शहरी माध्यमी झगमगाट सोडून खेडय़ातल्या भारताला आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले. यंदाच्या अर्थसंकल्पात हीच बाब दिसून येते. त्याचमुळे या अर्थसंकल्पाचा भर हा मूलत: ग्रामीण भारतावर असून शहरवासीय आणि शहरे यांच्या तोंडाला त्यात जवळपास पानेच पुसण्यात आली आहेत. या निमित्ताने इतके दिवस उजव्या बाजूने चालणाऱ्या मोदी सरकारने डावीकडे वळण्याची तयारी केलेली दिसते; परंतु त्यास महसुलाची जोड मिळाली नाही, नाही तर हे वळण म्हणजे समर्थ रामदासांच्या शब्दांत ‘देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पैलपार’ असेच ठरेल, हे सांगणाऱ्या या अग्रलेखावर या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडायची आहे.

याच विषयावर एमएसीसीआयएचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा आणि सनदी लेखापाल वाय. जे. पाध्ये या अर्थविषयक तज्ज्ञांची मते ‘लोकसत्ता’ने जाणून घेतली आहेत. या दोघांनीही या विषयाचा विविध दृष्टिकोनांतून महत्त्वपूर्ण आढावा घेतला आहे. त्यांच्या मांडणीचा विद्यार्थ्यांना आपली भूमिका अधिक सुस्पष्टपणे मांडण्यास उपयोग होईल.

वैचारिक निबंधलेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा सहावा लेख आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद या विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला. या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युझरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.