यवतमाळचा वैभव पंडित, मुंबईची अंकिता राजे विजेते

ब्लॉग बेंचर्समध्ये विधि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजी

ब्लॉग बेंचर्समध्ये विधि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजी

हिरानंदानी रुग्णालयात मूत्रपिंड चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉक्टरांना दोषी ठरवणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. आपल्या इथल्या ‘सामाजिक प्रथे’प्रमाणे काळास दोष दिला की झाले. तो दोष दूर करण्याची जबाबदारी आपल्यावर नाही आणि दोषींना शासन करण्याचे कर्तव्यही आपले नाही. समाजाच्या या दृष्टिकोनावर स्पष्टपणे मत मांडणाऱ्या ‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा यवतमाळच्या ‘अमोलकचंद विधि महाविद्यालया’चा विद्यार्थी वैभव पंडित ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाची विजेता ठरला. तर, या स्पर्धेत मुंबईच्या ‘शासकीय विधि महाविद्यालया’ची विद्यार्थिनी अंकिता राजे हिने दुसरे पारितोषिक पटकावले.

मूत्रपिंड चोरीचे आणि त्यातील डॉक्टरांच्या सहभागाचे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. तरीही ते थांबवण्याचा प्रयत्न होत नाही. याचे कारण ते थांबवण्याचे अधिकार असलेले आणि ते न थांबवण्यात ज्यांचा फायदा आहे, असे हितसंबंधी एकच आहेत. अशी अवयवचोरी थांबली तर रांगेत न थांबता अवयव कोणाला मिळू शकतील, या प्रश्नाच्या उत्तरात अवयवचोरी का थांबत नाही, हे सत्य दडलेले आहे. असे मत मांडणाऱ्या ‘देऊळ ते दवाखाना’ या अग्रलेखावर वैभव व अंकिता यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली.

वैभवला सात हजार आणि प्रमाणपत्र तर अंकिताला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. तसेच या विजेत्यांच्या बरोबरीनेच ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत माणिक भागवत यानेदेखील चांगली मते मांडली.

प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.  या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta blog benchers winner