मुंबई : सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांवर आधारित निकषांनुसार जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणार्‍या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन होणार आहे. या निर्देशांकानुसार सरस कामगिरी करणार्‍या तसेच लक्षवेधक प्रगती नोंदवणार्‍या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांचे व्याख्यान या कार्यक्रमात होणार आहे.  

महाराष्ट्राचा एकत्रित विकास दर्शवणार्‍या ढोबळ आकड्यांमध्ये गुंतून न राहता त्या विकासाचे पृथक्करण करून तो तळागाळापर्यंत कितपत झिरपत आहे, हे तपासण्याचे काम ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालातून करण्यात येते. सारस्वत बँक मुख्य प्रायोजक असलेल्या या उपक्रमाची सहप्रस्तुती संजय काकडे ग्रुप करत आहेत. गोखले इ्स्टिटट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, पुणे हे नॉलेज पार्टनर असलेल्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष. राज्य सरकारचे सांख्यिकी  खाते या उपक्रमाचे विदा सहकारी (डेटा पार्टनर) आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून नोंदवण्यात येणार्‍या आकडेवारीचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून जिल्ह्यांच्या विकासाचा निर्देशांक ठरवण्यात येतो. यंदाही गोखले संस्थेच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि तज्ज्ञांच्या मदतीने राज्यातील ३६ जिल्ह्यांचे आर्थिक, पायाभूत, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध निकषांच्या आधारे मोजमाप करण्यात आले.  मागास ते अतिविकसित अशा चार वेगवेगळ्या वर्गात जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक वर्गात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यांचा तसेच लक्षवेधक कामगिरी नोंदवणार्‍या जिल्ह्यांचा शुक्रवारी मुंबईत होणार्‍या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाच्या निवड समितीमध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह ‘आयएसईजी’ फाऊंडेशनचे संस्थापक भागीदार आणि संचालक डॉ. शिरीष संख्ये, ‘अर्थ इंडिया रिसर्च ॲडव्हायझर’चे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष  यांचा समावेश आहे.

डॉ. सौरभ गर्ग यांचे व्याख्यान

‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवाल प्रकाशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांचे व्याख्यान होणार आहे. ‘मेजरिंग व्हॉट मॅटर्स: स्ट्रेंग्थनिंग डिस्ट्रिक्ट लेव्हल डेटा फॉर मोर इन्फॉर्म्ड पॉलिसीमेकिंग’ (मापनाचे

महत्त्व: डोळस धोरण आखणीसाठी जिल्हा सांख्यिकीचे बळकटीकरण) हा या व्याख्यानाचा विषय आहे. भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेल्या डॉ. गर्ग यांनी याआधी सामाजिक न्याय व सक्षमीकरण, वित्त मंत्रालयात जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत.