मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात आज, सोमवारी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सहभागी होणार आहेत. हा संवाद सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘दृष्टी ’आणि ‘कोन’ या वेबसंवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते आमदार आशिष शेलार व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. या उपक्रमाची  सुरुवात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संवादाने होणार आहे.

आगामी निवडणुका, महाविकास आघाडी सरकारचा कारभार, देश व राज्यासमोरील मुख्य प्रश्न, काँग्रेस अंतर्गत घडामोडी यावर चव्हाण हे संवादातून उहापोह करतील. चार वर्षे राज्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा, कार्मिक, संसदीय कार्य या विभागांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला आह़े  काँग्रेस संघटनेत त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले असून, गुजरातसह काही राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. काँग्रेस संघटनेत सध्या ‘जी-२३’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंडखोर नेत्यांच्या यादीत चव्हाण यांचा समावेश होतो. पक्ष संघटनेत सुधारणा व्हावी आणि पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा या मागणीसाठी २३ नेत्यांनी पत्र दिले होते. त्या पत्रावर चव्हाण यांची स्वाक्षरी होती. गेल्याच आठवडय़ात चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भूमिका मांडली होती.

सहभागी नेते

० मंगळवार, २६ एप्रिल – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे

० बुधवारी, २७ एप्रिल – भाजप नेते आमदार आशिष शेलार

० रविवार, १ मे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सहप्रायोजक  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ