मुंबई : स्वकर्तृत्वाने आपल्या कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणार्‍या आणि आपल्या यशाला सामाजिक बांधिलकीची जोड देत इतरांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार्‍या स्त्रियांचा सन्मान ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२६’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या या पुरस्काराचे यंदाचे १३वे वर्ष असून नामांकन पाठवण्यासाठीचा आज, २५ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. त्यानंतर पाठवलेल्या नामांकनांचा विचार केला जाणार नाही.

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि ध्येयाप्रति असलेली निष्ठा यांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या स्त्रियांच्या कार्याची दखल घेणे, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. आपल्या कार्यातून समाजासमोर नवा आदर्श उभा करणार्‍या स्त्रियांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या उपक्रमातून केले जाते. आपल्या परिसरात, कार्यक्षेत्रात आपल्या कामातून आदर्श निर्माण करणार्‍या, इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या स्त्रियांचे नामांकन या पुरस्कारासाठी करता येणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, क्रीडा, कला व संस्कृती, समाजकार्य, आरोग्य व वैद्यकीय सेवा, उद्योग-व्यवसाय, प्रशासन यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या स्त्रियांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी नामांकनांचा ओघ सुरू झाला असून नामांकने पाठविण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे.

दरवर्षी दिल्या जाणार्‍या पुरस्काराला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळतो. अनेकदा समाज आणि कुटुंबीयांचाही विरोध पत्करून समाजासाठी धडाडीचे कार्य करणार्‍या स्त्रियांचाही समावेश त्यात असतो. आपल्या परिसरात, संस्थेत, कार्यक्षेत्रात किंवा समाजात अशा प्रेरणादायी, समर्पित, समाजहितासाठी झटणार्‍या स्त्रिया असतील तर त्यांचे नामांकन (एकदाच) अवश्य पाठवा. तुम्हीसुद्धा स्वत:चे नामांकन पाठवू शकता. तज्ज्ञ परीक्षकांची समिती आलेल्या नामांकनांतून ९ दुर्गांची निवड करणार आहे.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२६’च्या निवडीनंतर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज एका दुर्गेची ओळख ‘लोकसत्ता’मधून करून दिली जाणार आहे. त्यानंतर होणार्‍या बहारदार संगीतमय सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते नऊ दुर्गांचा सन्मान केला जाणार आहे.

नामांकने पाठवण्यासाठीचे काही नियम

– दुर्गा पुरस्कारासाठी स्त्रियांची माहिती जास्तीत जास्त ५०० शब्दांत पाठवावी. कोणतीही कात्रणे जोडू नयेत. संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे असावे.

– माहिती नेमक्या शब्दांत आणि मुद्द्यांच्या स्वरूपात असावी. त्यामुळे निवड प्रक्रिया सहज होते. निवड झालेल्या ्त्रिरयांकडून नंतर अधिक माहिती मागवली जाईल.

– नामांकन पाठवताना एकाच ई-मेलमध्ये त्या स्त्रीचे छायाचित्र, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई- मेल आयडी असणे आवश्यक.

– एका व्यक्तीसाठी फक्त एकच ई-मेल पाठवावा. जास्त ई-मेल्सचा विचार केला जाणार नाही.

– इंग्रजीमधून पाठवलेले नामांकन बाद ठरवले जाईल.

– व्हिडीओ, यूट्यूब लिंक्स किंवा इतर कोणत्याही लिंक्स पाठवू नयेत.

– अंतिम निवडीसाठी परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.

माहिती कुठे पाठवाल?

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार नामांकन’ असे लिहून ही नामांकने फक्त  loksattanavdurga2026 @gmail. com या ई-मेल आयडीवर पाठवावीत. त्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. टपालाने पाठवायची असल्यास पत्ता पुढीलप्रमाणे – ‘लोकसत्ता’ – महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०.

आपल्या असामान्य कार्याने समाजाला दिशा देणारे आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करणारे सशक्त व्यासपीठ म्हणजे ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार!’ या उपक्रमाशी ‘ग्रॅव्हिटस  फाऊंडेशन’ची अनेक वर्षांपासून नाळ जोडली गेली आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळावा म्हणून ही भागीदारी भविष्यातही अधिक दृढ होत राहील. – उषा काकडे,  ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

महिलांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला आणि मानसिक कणखरतेला समाजासमोर आणणार्‍या ‘लोकसत्ता दुर्गा’ या उपक्रमाशी जोडले जाणे हे ‘एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर्स’ या आमच्या संस्थेसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. या माध्यमाद्वारे अनेक महिलांना त्यांच्या नियोजित ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळो यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!  – सुहास मेहता, एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड