मुंबई : ‘चित्रपटांमधून स्त्री व्यक्तिरेखा कमालीच्या बदलत गेल्या आहेत. ्त्रिरयांमध्ये झालेले विलक्षण बदल, त्यांचा स्वाभिमानी स्वभाव हे सगळे टिपून घेण्याची, समजून घेत ते पडद्यावर दाखवण्याची क्षमता आजच्या स्त्री कलाकारांमध्ये आहे’ हे आवर्जून सांगणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी त्यांच्या पहिल्याच ‘सीमा’ या हिंदी चित्रपटात स्वतंत्र बाण्याची नायिका साकारण्याची संधी मिळाली होती, याची आठवण सांगितली. आज इतक्या वर्षांनी पुन्हा एखादी भूमिका करावीशी वाटली तर तीच भूमिका करायला आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

दादर येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे शुक्रवारी शुभा खोटे यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, त्यावेळी त्यांनी तत्कालिन मुंबई शहराच्या आठवणींनाही उजाळा दिला.  स्वकर्तृत्वावर व्यक्तिगत यश संपादन करतानाच, समाजातील इतरांसाठीही प्रगतीच्या वाटा खुल्या करणार्‍या, प्रचलित चौकटींच्या पलीकडे जात नवे आदर्श निर्माण करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना गौरवणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२६’ हा सोहळा शुक्रवारी पार पडला.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयासाठी ओळखल्या गेलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, मुंबई महापालिकेच्या आयुक्त डॉ. अश्विनी भिडे, एस. एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या नीलिमा मेहता आणि नऊ दुर्गांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लेखिका-दिग्दर्शिका, अभिनेत्री चित्रा पालेकर तसेच, वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या अनिता सांगळे, व्ही. एन. मुसळूणकर ज्वेलर्सचे सुहास मुसळूणकर, केसरी टूर्सच्या सुनीता पाटील, मेसर्स बी. जी. चितळे डेअरी यांचे गिरीश चितळे या मान्यवरांच्या हस्ते यंदाच्या नऊ ‘दुर्गां’ना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सतत नकारात्मक ऐकण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण, आपल्या आजूबाजूला सुमंगल, चांगलेही काही घडत असते. ते समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली, असे गिरीश कुबेर यांनी यावेळी सांगितले.

‘समाजाकडून बदलाची अपेक्षा करणारे काहीजण असतात, तर काही स्वत: पुढे होऊन समाजात बदल घडवतात. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून निवडण्यात आलेल्या आजच्या ‘दुर्गां’नी त्यांच्या कामातून समाजात क्रांती केली आहे. कुठल्याही पुरस्कार किंवा कौतुकाची अपेक्षा न करता जिद्दीने कार्य करत राहणार्‍या या दुर्गांचे कार्य समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने २०१४ मध्ये लोकसत्ता दुर्गा पुरस्कारांची सुरुवात झाली. तेव्हापासून सुरू असलेल्या या महायज्ञाने एका तपाची वाटचाल पूर्ण केली आहे’ अशा शब्दांत ‘लोकसत्ता’च्या फीचर एडिटर आरती कदम यांनी या पुरस्काराचे महत्त्व विशद केले.

यंदाही या पुरस्कारांसाठी साडेतीनशे अर्ज आले होते, त्यातून नऊ दुर्गांची निवड करणे हे आव्हान होते, पण दिग्दर्शिका-अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी, कवयित्री नीरजा तसेच, सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या परीक्षकांच्या समितीमुळे ही निवड करणे शक्य झाले.

या दुर्गा तिमिरातल्या आदित्य आहेत. त्यांनी पेटवलेल्या कार्यज्योतीचा प्रकाश तुमचेही आयुष्य उजळो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. या पुरस्काराचे नेटके निवेदन कुणाल रेगे यांनी केले, तर अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी लखलखत्या नऊ दुर्गांच्या कार्याची ओळख आपल्या ओघवत्या शैलीत प्रेक्षकांना करून दिली. कार्यक्रमाचे संहिता लेखन ‘लोकसत्ता’च्या किन्नरी नेरुरकर यांनी तर ध्वनीचित्रसंयोजन प्रवीण कोंका आणि पराग भोईर यांनी केले.

यंदाच्या नवदुर्गा

शेतीला नवी दिशा देणार्‍या निरंजना मारू-बंग, अपंग मुलांना सक्षम बनवणार्‍या डॉ. सरिता कडू, माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी मोलाचे योगदान देणार्‍या डॉ. अलका भावसार, थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरलेल्या सुजाता रायकर, ग्रामीण स्त्रियांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार्‍या डॉ. संगीता सवालाखे, बेवारस मृतदेहांची विटंबना टाळून त्यांच्यावर अंतिम संस्कार करणार्‍या अनिता गोसावी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील, विज्ञान आणि संशोधनाची ताकद समाजोपयोगी कार्यात करणार्‍या डॉ. शैला दिनकर आपटे आणि विविध क्रीडाप्रकारांत यश मिळवणार्‍या नेहा पावसकर.