मुंबई : लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या विषयांच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. तारा भवाळकर यांना यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ वितरण समारंभात त्यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यावेळी यंदाच्या‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ जाहीर झालेल्या ९ ‘दुर्गां’चा सन्मान केला जाणार आहे.

गौरवमूर्ती डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसंस्कृती, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला तसेच स्त्री जाणिवांवर आधारित विपुल लेखन केले आहे. निरंतर अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा वेध घेणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची ‘लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा’, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर’, ‘मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद’, ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा’, ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’, ‘सीतायन’ आदी पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मय कोश, मराठी समाज विज्ञान कोश, मराठी ग्रंथ कोश आणि शिल्पकार चरित्र कोश आदी कोशनिर्मितीमध्ये त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : कुटुंबविळखा! सर्वच पक्षांत सग्यासोयऱ्यांना ‘घाऊक’ उमेदवारी

हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या पुस्तकाचे पहिले मराठी भाषांतर त्यांनी केले असून ‘इंडिया बुक हाऊस’ने ते प्रकाशित केले होते. तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर डॉ. भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या डॉ. तारा भवाळकर या सहाव्या स्त्री-अध्यक्ष ठरल्या आहेत. आज होणाऱ्या दुर्गा पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते अंतिम निवड झालेल्या ९ ‘दुर्गां’चा सत्कार केला जाईल.

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील गोंधळ, भारूड, पोवाडा, जागरण या विविध लोककलांचे सादरीकरण हे या सन्मान सोहळ्याचे एक आकर्षण असणार आहे. महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करणाऱ्या या कला प्रकारांचा आऩंद यावेळी ‘जागर मराठमोळ्या लोकसंस्कृती’चा या कार्यक्रमातून उपस्थितांना घेता येणार आहे. यावेळी शाहीर कल्पना माळी आणि साथीदार पोवाडा सादर करतील. क्रुष्णाई आणि त्यांचे साथीदार भारूड सादर करतील. योगेश चिकटगावकर आणि त्यांचे साथीदार गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी या लोककला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोलकी, दिमडी, संबळ, तुणतुणे अशा सर्व लोकवाद्यांचे वादन स्त्री-वादक करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता पेंडसे आणि कुणाल रेगे करणार आहेत. कार्यक्रमासाठी काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

‘दुर्गां’चा गौरव

– ८६ हजार वंचित, निराधार मुलांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या कोल्हापूरच्या अनुराधा भोसले

– रत्नागिरीतील ‘स्नेह ज्योती निवासी अंध विद्यालया’च्या संस्थापिका आशा कामत

– पैठणी साडीबाबत अभ्यासक्रम तयार करणाऱ्या येवला येथील अस्मिता गायकवाड

– गेल्या १८ वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या लातूरमधील ‘आरोग्य मित्र’च्या कविता वाघे गोबाडे

– अपंग असूनही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हिंगोलीत वसतिगृह स्थापन करणाऱ्या मीरा कदम

– ‘ग्रिप्स’ नाट्य चळवळीअंतर्गत मुलांसाठी नाटकांची निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या शुभांगी दामले

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील स्त्रिया आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या स्नेहल लोंढे

– कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या डॉ. उषा डोंगरवार

– अभियांत्रिकी शिक्षणानंतर लष्करी सेवेत रुजू होऊन देशसेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या अहमदनगर येथील मेजर सीता अशोक शेळके

Story img Loader