मुंबई : आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतानाच समाजहितासाठीही भरीव योगदान देणाऱ्या स्त्रियांच्या प्रेरणादायी कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ प्रदान केले जातात. यंदा या पुरस्कारांचे १३ वे वर्ष असून, विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आणि इतरांसाठी आदर्श ठरणाऱ्या स्त्रियांच्या नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
स्वतःच्या कर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्यरत राहणाऱ्या आणि आपल्या योगदानातून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या स्त्रियांचा यंदाच्या पुरस्कारांसाठी विचार केला जाणार आहे. आपल्या कार्यातून समाजासमोर नवे आदर्श निर्माण करणाऱ्या अशा स्त्रियांची नामांकने पुरस्कारासाठी मागविण्यात येत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, कला-संस्कृती, शिक्षण, संशोधन, समाजकार्य, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग-व्यवसाय, प्रशासन यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या स्त्रियांना या पुरस्काराच्या माध्यमातून गौरविण्यात येणार आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी संवेदनशीलतेने आणि सातत्याने कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या कर्तृत्वाची दखल घेणे, हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे.
दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असतो. त्यासाठी अनेकदा समाज आणि कुटुंबीयांचाही विरोध पत्करून समाजासाठी धडाडीचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचाही समावेश असतो. यासाठी राज्यभरातून नामांकने मागवली जातात. आपल्या परिसरात, संस्थेत, कार्यक्षेत्रात किंवा समाजात अशा प्रेरणादायी, समर्पित, समाजहितासाठी झटणाऱ्या स्त्रिया असतील तर त्यांचे नामांकन अवश्य पाठवा. तुम्हीसुद्धा स्वत:चे नामांकन पाठवू शकता. तज्ज्ञ परीक्षकांची समिती आलेल्या नामांकनांतून दुर्गांची निवड करते. ‘लोकसत्ता दुर्गां पुरस्कार २०२६’च्या निवडीनंतर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत दररोज एका दुर्गेची ओळख ‘लोकसत्ता’मधून करून दिली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या बहारदार संगीतमय सोहळ्यात आणि नामवंतांच्या हस्ते नऊ दुर्गांचा सन्मान केला जाणार आहे.
नामांकने पाठवण्यासाठीचे काही नियम
काय अपेक्षित?
- दुर्गा पुरस्कारासाठी स्त्रियांची माहिती जास्तीत जास्त ५०० शब्दांत पाठवावी. कोणतीही कात्रणे जोडू नयेत. संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे असावे.
- माहिती नेमक्या शब्दांत आणि मुद्द्यांच्या स्वरूपात आणि थोडक्यात असल्यास उत्तम. त्यामुळे निवड प्रक्रिया सहज होते. निवड झालेल्या स्त्रियांकडून नंतर अधिक माहिती मागवली जाईल.
- नामांकन पाठवताना एकाच ई-मेलमध्ये त्या स्त्रीचे छायाचित्र, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई- मेल आयडी असणे आवश्यक.
- एका व्यक्तीसाठी फक्त एकच ई-मेल पाठवावा. जास्त ई-मेल्सचा विचार केला जाणार नाही.
- इंग्रजीमधून पाठवलेले नामांकन बाद ठरवले जाईल.
- व्हिडीओ, यूट्यूब लिंक्स किंवा इतर कोणत्याही लिंक्स पाठवू नयेत.
- अंतिम निवडीसाठी परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.
माहिती कुठे पाठवाल?
नामांकने फक्त loksattanavdurga@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावीत. त्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. टपालाने पाठवायची असल्यास पत्ता पुढीलप्रमाणे – ‘लोकसत्ता’ – महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०.
