scorecardresearch

‘धुमशान’ रविवारपासून!

या स्पर्धेची सुरुवात रविवार, २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यातून होईल.

‘धुमशान’ रविवारपासून!

ठाण्यातील महाविद्यालयांच्या दमदार एकांकिकांचे सादरीकरण

आठवडाभराच्या धकाधकीनंतर थकल्याभागल्या जिवाला आराम देणारा वार म्हणजे रविवार! सातही वारांमध्ये या वाराचे महत्त्व काही वेगळेच आहे. आरामात फुटलेली सकाळ, सुस्तावलेली दुपार आणि कौटुंबिक संध्याकाळ हे रविवारचे समीकरण उद्याच्या रविवारी मात्र ठाण्यातील महाविद्यालयीन तरुण उधळून लावणार आहेत. कारण आहे, ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे! ठाण्यातील एकापेक्षा एक सरस महाविद्यालये रविवारी रंगणाऱ्या प्राथमिक फेरीत आपला कलाविष्कार सादर करणार आहेत.

lok-ekankika1

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांची गुणवत्ता हेरून त्यांच्यासाठी मराठी मनोरंजन क्षेत्राची कवाडे खुली करण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. गेली तीन वर्षे अस्तित्व या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

 

ही स्पर्धा आधी शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत सुरू होणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे रत्नागिरीतील प्राथमिक फेरी आता ६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची सुरुवात रविवार, २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यातून होईल.

महाअंतिम फेरी ‘झी युवा’वरही राज्यातील आठ विभागांमध्ये सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या फेरीचे प्रसारण ‘झी युवा’ या वाहिनीवर होणार आहे. त्यामुळे राज्यातील या तरुण नाटय़कर्मीचा आविष्कार राज्यात नाही, तर जगभरात पोहोचणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या