मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपात विराजमान होत आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी, तसेच मूर्तिकार आणि कला दिग्दर्शकांचा सन्मान करण्यासाठी यंदाही ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरणार्‍या मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान देऊन गौरविण्यात येणार आहे,

विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व लक्षवेधी देखावे आणि मूर्तिकारांनी कल्पकतेने घडविलेल्या भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि मूर्तिकार तसेच कला दिग्दर्शकांच्या कलागुणांची दखल घेण्यासाठी दरवर्षी ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा’ आयोजित केली जाते.

या स्पर्धेसाठी प्रवेशिका उपलब्ध झाल्या असून कुलाबा ते माहीम, वांद्रे ते जोगेश्वरी, गोरेगाव ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, विद्याविहार ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली – कल्याण आणि नवी मुंबई या ८ विभागांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल. गणेशमूर्तींची कलात्मकता, सजावट, मांडणी, स्वच्छता, सजावटीचा विषय निवडताना ठेवलेल्या जागतिक, राष्ट्रीय, राज्य, स्थानिक पातळीवरील जनजागृतीचा विचार असणारी संकल्पना, मंडळाची गणेशोत्सवाव्यतिरिक्त समाजाभिमुख कार्यपद्धती, पर्यावरण, रक्षणासाठीच्या योजना आणि संकल्पनेवर आधारित संहिता लेखन, प्रकाशयोजना, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिक्षेपकाचा आवाज आदी विविध गोष्टी तपासून स्पर्धेच्या नियम व अटींच्या आधारे तज्ज्ञ परीक्षकांकडून पारितोषिकांसाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

बक्षिसांचा वर्षाव

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२६’मध्ये विभागवार पारितोषिकांसह सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान, ५१ हजार १ रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विभागवार सर्वोत्कृष्ट मंडळ पारितोषिक ९ हजार ९९९ रुपये आणि विभागवार पर्यावरणस्नेही विशेष पारितोषिक ९ हजार ९९९ रुपये, तसेच विभागवार सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिगदर्शक, संहिता लेखन, भव्य देखावा तयार करणार्‍या विजेत्या मंडळास २ हजार १ रुपयांचे विशेष पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येईल. यासह सर्व सहभागी मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.

प्रवेशिका कधी आणि कुठे मिळणार?

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२६’साठी विनामूल्य प्रवेशिका ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात उपलब्ध असतील. सहभागी होणार्‍या मंडळांना या प्रवेशिका आवश्यक त्या माहितीसह ८ ते १० सप्टेंबरदरम्यान सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात आणून द्यायच्या आहेत. मुदतीच्या अंतिम तारखेनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच संहिता लेखनासाठी प्रवेश अर्जासह संहिता, लेखकाचे नाव आदी माहिती प्रवेश अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी धर्मेश म्हसकर यांच्याशी मोबाइल क्रमांक ९७७३१५४९२४ वर संपर्क साधावा.

मुंबई : ‘लोकसत्ता’ ६ वा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१
ठाणे : ‘लोकसत्ता’ होशबानू मॅन्शन, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प)

गणेशोत्सव म्हणजे आनंदाची अशी परंपरा, जी माणसांना पुन्हा एकदा एकमेकांशी जोडते. एनकेजीएसबी बँकेसाठी गणेशोत्सव हा आपल्या ग्राहकांशी आणि समाजाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा एक सुंदर प्रसंग आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील गणेश मंडळे अनेक वर्षांपासून आपल्या परिसरातील उत्सवाची परंपरा जपत समाजाला एकत्र आणण्याचे काम करीत आहेत. या उत्सवाचा एक भाग होता येणे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सीए हिमांगी नाडकर्णी, अध्यक्ष, एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

प्रायोजक
मुख्य प्रायोजक : एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
सहप्रायोजक : लागू बंधू ज्वेलर्स, माचो हिंट, आदित्यराज ग्रुप, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
इकोफ्रेंडली पार्टनर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
पॉवर्ड बाय : ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड, एम पी ग्रुप, दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड