चित्रपट माध्यमात दिग्दर्शिकांचा जमाना सुरू झाला नव्हता तेव्हाची गोष्ट. दिग्दर्शक म्हटला की ‘तो’च असणार, हे जणू प्रेक्षकांनीही गृहितच धरलेलं. अशा स्थितीत १९८०मध्ये दृष्टीहीनांचं जगणं मांडणारा ‘स्पर्श’ हा पहिला सुखद धक्का होता. त्याच्या पुढच्याच वर्षी झळकला ‘चष्मे बद्दूर’! या चित्रपटाच्या नामावलीत ‘दिग्दर्शक’ अशी झळकणारी पाटी बांगडय़ा ल्यायलेल्या हातांनी दूर सारल्याचे दृश्य रूपेरी पडद्यावर दिसलं आणि पाठोपाठ नाव झळकलं.. ‘दिग्दर्शिका सई परांजपे’! आणि सुरू झाला संवेदनशील पण खटय़ाळ चित्रपटांचा सिलसिला..

आज दिग्दर्शिकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. निर्मातेच नव्हे, तर प्रेक्षकही त्यांच्यावर  विश्वास टाकून चित्रपटांना गर्दी करीत आहेत. पण जेव्हा ही वाट दिग्दर्शिकांसाठी तेवढी सुगम नव्हती तेव्हा त्या वाटेवर पाऊल रोवणाऱ्या सई परांजपे यांचे कर्तृत्व म्हणूनच अतिशय प्रेरक आहे. त्यांच्या या वाटचालीचे अनुभव, या वाटचालीत चित्रपट, नाटक आणि लेखन या क्षेत्रांना समृद्ध करण्यातले त्यांचे योगदान हे सारं त्यांच्याच शब्दांत जाणून घेण्याची संधी रसिकांना लाभणार आहे.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘लोकसत्ता गप्पा’च्या नव्या पर्वाच्या निमित्तानं ही संधी मिळणार आहे. सई परांजपे यांच्या आजवरच्या कलाप्रवासाची ही सय आज रविवार १९ ऑगस्टला होणाऱ्या लोकसत्ता आयोजित, ‘केसरी’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून उलगडणार आहे. या गप्पा खुलवणार आहेत ज्येष्ठ संवादक सुधीर गाडगीळ.

त्यांचे चित्रपट साधेसरळ आणि निर्विष होते. विनोदाची त्यांची हाताळणीही अशी होती की प्रेक्षक हसता हसता अंतर्मुख होत. मग एका मराठी नाटकावर बेतलेला आणि ‘ससा आणि कासवा’च्या गोष्टीला आधुनिक रूपात पाहणारा ‘कथा’ असो, राष्ट्रीय साक्षरतेची झाडाझडती घेणारा ‘अंगूठा छाप’ असो, ग्रामीण भागांतील बेरोजगारीमुळे शहराकडे वळणारा तरुणांचा ओघ आणि त्यातून त्यांच्या वैवाहिक जीवनाला लागत असलेलं ग्रहण मांडणारा ‘दिशा’ असो की संगीत क्षेत्रातील दोन बहिणींमधील सुप्त स्पर्धेची बाजू शोधू पाहणारा ‘साज’ असो.. ‘अडोस पडोस’ किंवा ‘छोटे बडे’ सारख्या मालिका असोत, ‘सख्खे शेजारी’सारखं निखळ विनोदी नाटक असो की अतृप्त नात्याच्या ओझ्यानं पिचलेल्या स्त्रीचं पराभूत बंड मांडणारं, काळाच्या मानानं कितीतरी पुढचं असलेलं ‘जास्वंदी’सारखं नाटक असो.. सई परांजपे यांच्या प्रत्येक कलाकृतीनं प्रत्येकाला माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि आपलं माणूसपण तपासायलाही शिकवलं. या सगळ्या प्रवाही वाटचालीतल्या आठवणी ऐकणं हादेखील एक वेगळा अनुभवच ठरणार आहे.