लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : केवळ दर्शनी प्रगतीवर विसंबून न राहता, आकडेवारी आणि शास्त्रीय निकषांच्या आधारे महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या खर्याखुर्या प्रगती वा अधोगतीचा वास्तवदर्शी अहवाल मांडणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ येत्या आठवड्यात, २० मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदर्शित होईल. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्याचे सचिव डॉ. सौरभ गर्ग हे या सोहळ्याचे मुख्य पाहुणे आणि मार्गदर्शक असतील.
सारस्वत बँक मुख्य प्रायोजक असलेल्या या उपक्रमाची सहप्रस्तुती संजय काकडे ग्रुप करत आहेत. गोखले इ्स्टिटट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, पुणे हे नॉलेज पार्टनर असलेल्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष. राज्य सरकारचे सांख्यिकी खाते या उपक्रमाचे विदा-सहकारी (डेटा पार्टनर) असून राज्याचे अर्थशास्त्र-पारंगत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्य मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडतात.
कोणत्याही प्रांताच्या प्रगतीत तेथील जिल्हा स्तरावरील प्रशासकीय कामगिरी निर्णायक असते. तथापि त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही. म्हणून केवळ राज्यस्तरीय सरासरी आकडेवारीचा विचार न करता जिल्हानिहाय प्रगतीचा मागोवा घेऊन त्याची वस्तुस्थिती सार्वजनिक करण्याच्या भूमिकेतून ‘लोकसत्ता’ने २०२३ पासून ‘जिल्हा निर्देशांक’ हा उपक्रम सुरू केला. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून नोंदवण्यात येणार्या आकडेवारीचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून जिल्ह्यांच्या विकासाचा निर्देशांक ठरवण्यात येतो. पुणे येथील गोखले संस्थेच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि तज्ज्ञांच्या मदतीने राज्यातील ३६ जिल्ह्यांचे आर्थिक, पायाभूत, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध निकषांच्या आधारे मोजमाप करण्यात येते. मात्र, हे करताना अतिविकसित आणि मागास जिल्ह्यांना एकाच पारड्यात न तोलता त्यांची वर्गवारी केली जाते. त्यानुसार ‘जिल्हा निर्देशांक’ तयार करून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीने मुंबईत केले जाते.
निर्देशांकात अग्रेसर राहणार्या निवडक जिल्ह्यांचा सन्मानदेखील या सोहळ्यात करण्यात येतो. गतवर्षी ‘जिल्हा निर्देशांक’ सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत पुढील वर्षी ‘सीएम डॅशबोर्ड’ हा उपक्रम ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ उपक्रमाशी भागीदारी करील, अशी घोषणा केली. ‘लोकसत्ता’सारख्या त्रयस्थ संस्थेकडून शासकीय यंत्रणेकडून केलेल्या कामासाठी जिल्ह्याला गौरविण्यात येत असल्याने आपल्यालाही हा सन्मान मिळावा, अशी स्पर्धेची भावना जिल्ह्यांमध्ये रुजत आहे, ही चांगली बाब असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
जिल्हाधिकार्यांचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात २० मार्च रोजी हा अहवाल प्रसिद्ध होईल. ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालात सर्वोत्तम आणि लक्षणीय प्रगती नोंदवणार्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना या कार्यक्रमात सन्मानित केले जाईल. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाचे अभ्यासू सचिव डॉ. गर्ग जिल्हास्तरीय प्रगतीचे मापन यावर उपस्थितांस संबोधतील.
– मुख्य प्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
– सहप्रस्तुती : संजय काकडे ग्रुप
– सहप्रायोजक : व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड, कमला ग्रुप
