मुंबई : नव्या पिढीचे विचार, त्यांची मते, अभ्यास-संशोधनाची इच्छा, नवे काही करून पाहण्याची उमेद आणि त्यातून उभ्या राहिलेल्या यशाच्या प्रेरक गाथा समाजासमोर आणत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे नवे पर्व सुरू झाले आहे. आरोग्य क्षेत्रापासून दैनंदिन आयुष्याशी निगडित असणाऱ्या हरएक वैविध्यपूर्ण समस्यांचा स्वत:च्या परीने धांडोळा घेत त्यावर अभ्यास-संशोधनातून उत्तर शोधणाऱ्या, समाजाभिमुख कार्य उभारणाऱ्या या तरुण पिढीच्या कर्तृत्वाच्या कथा अक्षरश: थक्क करायला लावणाऱ्या आहेत.

कृत्रिम प्रज्ञेपासून हरतऱ्हेचे आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असताना त्याचा अचूक उपयोग करत आजची तरुण पिढी आपापल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाची नवनवी भरारी घेते आहे. छोट्याशा कल्पनेतून उभे राहणारे मोठे उद्योग, खेळाच्या मैदानातही कष्टसाध्य यश मिळवत तेजाने झळाळणारे तरुण खेळाडू, कला-मनोरंजन क्षेत्रात सर्जनशीलतेच्या बळावर होणारी दर्जेदार निर्मिती, रोजच्या प्रशासकीय कामातही सुसूत्रता आणत लोकांचे काम सहजसोपे करण्यासाठी झटणारे तरुण अधिकारी अशा एक ना अनेक पद्धतीने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या युवा पिढीचे कार्य समाजासमोर यायला हवे. प्रसिद्धीपासून दूर राहात आपापल्या क्षेत्रात कार्यमग्न असलेल्या या युवा गुणवंतांना योग्य वेळी पुरस्काराच्या रूपात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या आठव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

आत्तापर्यंत देशभरातील १०० हून अधिक प्रज्ञावंत तरुण मंडळींचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यंदाही या पुरस्कारांसाठी शहरी-ग्रामीण भागातील संशोधक, नवउद्योजक, प्रशासकीय अधिकारी, क्रीडापटू, तंत्रज्ञान, आरोग्य अशा विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा शोध घेण्यात येणार आहे. यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी अर्ज नोंदणी सुरू झाली असून सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून किंवा http: //tiny.cc/taruntejankit या संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी करता येईल.

प्रवेशअर्ज कसा भराल?

‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठीच्या निवड प्रक्रियेचे तपशील http: //tiny.cc/taruntejankit या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून अर्ज ऑनलाइन भरून पाठवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर आपल्याभोवताली असणाऱ्या गुणवंत तरुण-तरुणींची नावे माहितीसह सुचवता येतील.

● ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व सिद्ध करणारे चाळिशीच्या आतील युवा गुणवंत या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील.
● पुरस्कार प्रक्रियेचा भाग होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अर्ज भरणे बंधनकारक आहे.
● आलेल्या प्रवेशिकांमधून मान्यवरांच्या स्वतंत्र समितीकडून विविध निकषांच्या आधारे ‘तरुण तेजांकितां’ची निवड केली जाईल.
● निवड झालेल्या प्रज्ञावंतांना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

प्रायोजक
सहप्रायोजक – सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि पीएनजी ज्वेलर्स